Pune News : मुंढव्यात वाहतूक पोलिसास धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  सीटबेल्ट न लावल्याने कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला कार चालकाने धक्काबुक्की केल्याची घटना मुंढवा भागात घडली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

सनी तानाजी शिंदे (वय २५,रा. वडगाव शिंदे, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक शाखेतील पोलीस नाईक दयानंद गायकवाड यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुंढवा चौकात गायकवाड सोमवारी सकाळी वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी मोटारचालक शिंदे तेथून निघाला होता. शिंदेने आसनपट्टा (सीटबेल्ट) न लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर गायकवाड यांनी कारवाई सुरू केली. त्यावेळी शिंदेने हुज्जत घालून गायकवाड यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिंदेला अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करत आहेत.