Pune News : ‘मशीन’चा धक्का लागून तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सिंहगड भागात बांधकाम प्रकल्पावर पायलिंग मशीनचे काम सुरू असताना हलगर्जीपणा झाल्याने या मशीनचा धक्का लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सुपरवायझरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय मनेक टेकाम (वय 20, रा. धर्मावत नगर लेबर कॅम्प मध्य प्रदेश) असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद पाइल्स प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सुपरवायझर विशाल दिनेश चोबे (वय 26, सध्या रा. धायरी, मूळ उत्तरप्रदेश) व पायलींग मशीनचा चालक अजय विजय बहादुर यशपाल (वय 24, रा. वडगाव बुद्रुक, मूळ उत्तरप्रदेश) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार विशाल गवळी यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव खुर्द परिसरात सुंदर संस्कृती फेज 4 या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी पायलिंग मशीनने काम करण्यात येत आहे. तर अक्षय हा याठिकाणी काम करत होता. दरम्यान काम सुरू असताना हलगर्जीपणा झाल्याने पायलिंग मशीनचा धक्का अक्षय याला लागला. यात अक्षय गंभीर जखमी झाला. यातच त्याचा मृत्यू झालाय. घटनेनंतर याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. त्यानंतर आरोपींचा निष्काळजीपणा झाल्यानेच अक्षय मृत्यू झाला असल्याचे समोर आल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.