Pune Corona Vaccination : पुण्यात उद्या (मंगळवार) लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महानगरपालिकेला कोरोना विरोधी लसींचा पुरवठा न झाल्याने सोमवारी (दि.17) पुणे मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. अद्याप लसींचा पुरवठा झाला नसल्याने मंगळवारी (दि.18) पुणे मनपा हद्दीतील लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहीती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दरम्यान, पुणे शहरामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. लसींचा पुरवठा कमी होत असल्याने पहिला डोस बंद करुन दुसरा डोस दिला जात आहे. तसेच कोरोना विरोधी लसींचा पुरवठा झाला नसल्याने आज (सोमवार) शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. सोमवारी देखील लसींचा पुरवठा न झाल्याने मंगळवारी लसीकरण होणार नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहर आघाडीवर होतं. मात्र, आता पुण्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दि.17) पुण्यात रुग्ण संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आली. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तीन आकडी झाल्याने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘धन्यवाद पुणेकर !’ असे ट्विट करुन पुणेकरांचे आभार मानले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये उद्या लसीकरण बंद

पिंपरी/पुणे : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात कोरोना विरोधी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेला शासनाकडून लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने शहरातील लसीकरण केंद्र मंगळवारी (दि.18) बंद राहणार आहेत. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्याने मंगळवारी (दि.18) कोणत्याही वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. लसीकरण केंद्र बंद असल्याने लसीकरण केंद्राच्या परिसरात नागरिकांनी गर्दी करु नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.