पुण्याचे नाशिक होऊ देऊ नका – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील अनेक खासगी अन् सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांची भरती थांबवण्याची वेळ आली आहे. ऑक्सिजन किंवा रेमडेसिविर यांच्या पुरवठ्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, ती त्यांनी पूर्ण क्षमतेने उभारावी. या संबंधीची भावना आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने पुण्याचे नाशिक होऊ देऊ नये असे, आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. रेमडेसीविरचा विषय जसा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे, तसा ऑक्सिजनचा अन्न व औषध पुरवठा प्रशासनाच्या नियंत्रणात येतो. त्यामुळे त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत खूप अगोदर पावले उचलायला हवी होती. मात्र आता तरी मार्ग काढणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

कोरोनामुळे पुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर महापौर मोहोळ म्हणाले की, पुण्यातील ऑक्सिजन व रेमडेसिविर च्या समस्येवर आज विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यात लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग निघेल, अशी आशा आहे. शहरात खासगी व सरकारी हॉस्पिटल मिळून साधारण 250 मेट्रिक टन ऑक्सिजन रोज पुण्याला लागतो. मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यात कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयातील गंभीर रुग्णांना दुसऱ्या अन्यत्र हलवावे लागत आहे. तसेच काही ठिकाणी भरती थांबवावी लागली. पण आता पुरेसा ऑक्सिजनचा साठा निर्माण झाल्याशिवाय ऑक्सिजन बेड सुरू करणे शक्य नाही. ही परिस्थिती वाईट असल्याचे मोहोळ म्हणाले.