Pune : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वल्लभभाई पटेल रुग्णालयातील रुग्णांमध्ये समाधानाची भावना – डॉ. उषा तपासे

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगली सेवा मिळत आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये समाधानाची भावना आहे. पटेल हॉस्पिटलमध्ये अचूक निदान, वेळेवर औषधोपचाराची सुरुवात व योग्य वैद्यकीय सल्ला यामुळे आजार बरा होण्याचे प्रमाण चांगले आहे. हॉस्पिटल मध्ये सुमारे 120 बेड असून, त्यामध्ये पुरुष 37, महिला 34 आणि अतिदक्षता विभागामध्ये 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रेमडिसिव्हर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा सर्वत्र आहे. तरीसुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये रुग्णांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे येथील प्रभारी डॉ. उषा तपासे यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रभारी डॉ. उषा तपासे, डॉ. उदय भुजबळ, डॉ. महेश दळवी उपस्थित होते.

डॉ. तपासे म्हणाल्या की, आता रुग्णालयामध्ये गॅससिलिंडर आहेत, तर सिव्हिल सर्जनकडून 30 रेमडिसिव्ह इंजेक्शन मिळाले होते, आता प्रशासनाकडून 112 रेमडिसिव्ह इंजेक्शन मिळू लागले आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात अडचण आली नाही. मागिल महिन्यापासून कोरोनाबाधितांवर उपचार करताना डॉक्टरांसह सर्वांचीच कसरत सुरू आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयामध्ये 100 बेड असून, दररोज सरासरी सहाजण बरे होऊन घरी जात आहे.

तर सहाजणांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात आहे. आतापर्यंत प्रत्येकाला उपचार देता येईल, अशीच व्यवस्था केली आहे. डॉक्टरांबरोबर इतर कर्मचारी वर्गाला नागरिकांकडूनही चांगले सहकार्य लाभत आहे. आता कोरोनाचा प्रसार वाढत आहे, त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहून काळजी घेण्याची गरज आहे. शासनाने लॉकडाऊन जारी केला आहे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे सांगितले आहे, त्याची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. भुजबळ यांनी सांगितले की, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाला रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नव्हते. रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होत होती. त्यामुळे हॉस्पिटलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयालाकडे रेमडिसिव्हर इंजेक्शन वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या नावाने मिळावे, अशी मागणी केली. त्याप्रमाणे मागिल दोन दिवसांपासून रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत असल्याने रुग्णांना इतरत्र धावाधाव करावी लागत नाही, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे.

रेमडिसिव्हर इंजेक्शन, बेड, व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची पुरे दमछाक होत आहे. शासकीय, निमशासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेडसाठी रुग्ण वेटिंगवर आहेत, एवढेच नाही, तर स्मशानभूमीमध्येसुद्धा आता वेटिंग पे वेटिंग अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहे. स्वतःबरोबर कुटुंबियांसाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हीच जमेची बाजू ठरणार आहे, असा सबुरीचा सल्ला पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे यांनी दिला आहे.