Pune-Pimpri News : उच्चभ्रू परिसरातील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 16 नायजेरियन तरुणींची सुटका

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा पथकाने पर्दाफाश केला आहे. ही कारवाई सांगवी परिसरात करण्यात आली असून 16 नायजेरियन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. सेक्स रॅकेटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी महिला आढळून येण्याची ही पहिलीच घटना आहे.

सांगवी परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव परिसरात या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पीटा कायद्यांतर्गत केलेल्या या कारवाईत 16 नायजेरियन महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव या उच्चभ्रू परिसरामध्ये चार महिलांमार्फत देहविक्रिचा व्यवसाय होत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी 16 नाजयेरियन तरुणी त्या ठिकाणी आढळून आल्या. तर ज्या महिलांमार्फत देहविक्रीचा व्यवसाय होत होता त्या 4 महिला देखील त्या ठिकाणी आढळून आल्या. या चार महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच एका नायजेरियन तरुणाला अटक करण्यात आली आहे. संबंधित महिला भारतात कशा आणल्या गेल्या याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

भर लोकवस्तीतमध्ये परदेशी महिलांकडून अशा प्रकारे देह विक्रीचा व्यवसाय करुन घेणारा मुख्य आरोपी कोण आहे, याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिंजवडी परिसरामध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. ऑनलाईन माध्यमातून ग्राहक शोधून त्यांना महिला पुरविल्या जात होत्या. यासाठी ग्राहकांकडून 8 ते 20 हजार रुपये घेतले जात होते. या कारवाईत 13 महिलांची सुटका करण्यात आली होती.