Pune PMC News | आठवडाभरात आदर्श रस्त्यांचे रूपडं पालटणार ! 15 रस्ते होणार अतिक्रमण मुक्त आणि चकाचक

पुणे – Pune PMC News | महापालिकेने शहरातील प्रमुख १५ रस्ते आदर्श रस्ते म्हणून मेन्टेन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने या रस्त्यांची कामे केली जात आहेत. आता येत्या सोमवारपासून शंभर टक्के यंत्रणा कामाला लावत शहरातील पंधरा रस्त्यावरील राडारोडा, अतिक्रमण मुक्त करण्याबरोबरच क्लिनींग, एसटीपीच्या पाण्याने रस्ते धुण्यासह डिव्हायडरचे रंगकाम केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांनी दिली. त्यामुळे पुढील आठवडाभरात आदर्श रस्त्यांचे रूपडं पालाटणार आहे.

महापालिकेने शहरातील १५ प्रमुख रस्ते आदर्श रस्ते म्हणून घोषित केले आहेत. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही. तसेच रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांवर किमान तीन वर्षे कुठल्याही पद्धतीने खोदाई होणार नाही, अतिक्रमण होणार नाही, दुभाजक आणि रोड फर्निचर आकर्षक आणि स्वच्छ ठेवण्यात येतील. यासोबतच अनधिकृत फलक, पोस्टर्स आणि ओव्हर हेड केबल मुक्त ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी अतिक्रमण विभागाला या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश यापुर्वीच दिले होते. त्यानुसार नगर रस्त्यावरील बेकायदा बांधकामे पाडण्यात आली. तसेच रस्त्यांवर उभी केलेल्या बेकायदा हातगाड्या देखील उचलण्यात आल्या. येरवड्यातील अवैध बांधकामे हटवण्यात आली. शहरातील १५ आदर्श रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रण होणार नाही, याची काळजी पालिका घेत आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे व मुंबई प्रमाणेच पुणे शहरातही महास्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिका प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून शहरातील आदर्श पंधरा रस्ते त्यावरील पदपथ, दुभाजक आदी स्वच्छ करून पाण्याने धुण्यात येणार आहेत.

या रस्त्यांचा आदर्श रस्त्यांत समावेश

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता ते सेनापती बापट रस्ता, शिवाजी रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे. या संपुर्ण रस्त्यांची एकुण लांबी ९२ किलोमीटर आहे. यात सर्वात मोठा रस्ता हा नगर रस्ता असुन, याची लांबी सुमारे १४ किलोमीटर इतकी आहे. बाणेर रस्ता साडेसात किलोमीटर, कर्वे रस्ता सव्वा सहा किलोमीटर या रस्त्यांवर काम केले जाणार आहे. इतर रस्त्यांची लांबी साधारण तीन ते सात किमी इतकी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जमीनीच्या व्यवहारात फसगत व अतिक्रमण टाळण्यासाठी महापालिका विकास आराखड्यातील प्रस्तावीत रस्त्यांची यादी वेबसाईटवर टाकणार