Pune News : रस्त्याने जाणार्‍या पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारीतील 5 अट्टल गुन्हेगारांना अटक

ADV

पुणे : पुलगेट येथील बसस्टँडच्या बाजूला झुडपात थांबलेल्या ५ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या कर्मचार्‍यांनी पाठलाग करुन पकडले़ रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारीत ते होते.

चंद्रकांत बसवंत गायकवाड (वय ५३, रा. सोलापूर), अंबादास मल्लिकार्जुन जाधव (वय २८, रा. मांजरी, हडपसर), सचिन बाळकृष्ण वावडेकर (वय ३९, रा. अंबरनाथ, मुंबई), बलराम श्रीकांत गायकवाड (वय २८) आणि आशिष अंबादास जाधव (वय २२, दोघे रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध खुन, दुखापत, गंभीर दुखापत, पीएमपी बस आणि रेल्वेमधील चोर्‍या आणि इतर चोर्‍या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ADV

गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस अंमलदार मोहसीन शेख व किशोर वग्गु यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलीस नाईक उत्तम तारु, समीर पटेल, कादीर शेख यांच्या मदतीने पुलगेट बसस्टँडवर सापळा लावला. चोरट्यांना पोलिसांचा संशय आल्याने पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांच्याकडून १ कोयता, १ चाकू, ४ मोबाईल, मिरची पूड, रोख ११०० रुपये असा ९ हजार ३२० रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले अधिक तपास करीत आहेत.