Pune : ‘तू माझा बाप आहेस का? तू मला सांगणारा कोण’? म्हणणार्‍या ‘त्या’ पोलिस शिपायाला जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नाकाबंदीसाठी हजर राहण्यासाठी सांगितल्यावरून हवालदाराला गज तसेच लाथा मारून जखमी करणाऱ्या पोलिस शिपायाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे आणि तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. ए. दरवेशी यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

सुरज जालिंदर पोवार असे जामीन मिळालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस हवालदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार भोसरी पोलिसात गुन्हा दाखल आहे. ही घटना दापोडीतील हॅरीस पूलावर २२ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता घडली होती. कोविड 19 प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलिसांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. पोलिस मुख्यालयात नेमुणकीस असलेले पोलीस हवालदार यांना भोसरी पोलिस ठाणे अंतर्गत बंदोबस्तासाठी दापोडीतील हॅरीस पूल येथे नाकाबंदी पॉईंटवर नेमण्यात आले होते. याच ठिकाणी सुरज पोवार यालाही नाकाबंदीसाठी नेमले होते. पोवार हा 22 एप्रिल रोजी रात्री साडेदहापर्यंत बंदोबस्तासाठी न आल्याने फिर्यादींनी त्याला कॉल केला तसेच बंदोबस्तासाठी येण्याबाबत सांगितले. त्यावरून दोघांत शाब्दिक वाद झाले. ‘तू माझा बाप आहेस का? तू मला सांगणारा कोण’ असे पोवार फिर्यादी यांना म्हणाला. त्यानंतर पोवारने पूलावर येत फिर्यादीच्या डाव्या पायावर गजाने मारहाण केली. फिर्यादी हे जमिनीवर कोसळल्यानंतर पोवारने फिर्यादीच्या तोंडावर बुटाने लाथा मारल्या. त्यामध्ये फिर्यादींच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. पोवार याने ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. अभिजित सोलनकर आणि ऍड.अक्षय वाडकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.