Pune : उत्पादन होणारा सर्व ऑक्सिजन कोरोना उपचारासाठी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना रुग्ण वाढत असताना ऑक्सिजन चाही तुडवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादकांकडील 100 टक्के ऑक्सिजन कोरोना उपचारासाठी वापरण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या सव्वा लाखाच्या पुढे गेली आहे. यापैकी साधारण 12 हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
पुण्यासारख्या शहरात शेजारील जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत आहेत. शहरातील खासगी, महापालिका व शासकीय रुग्णालयातील सर्वच बेडस फुल आहेत. तर दुसरीकडे प्रशासन ऑक्सिजन बेडस व व्हेंटिलेटर बेड्सची सुविधा वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

परंतु दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवू लागला आहे. जिल्हा प्रशासनानेही यापूर्वीच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हाधिकारी हे स्वतः मोनिटरिंग करत आहेत. आतापर्यंत 80 टक्के ऑक्सिजन हा कोरोनासाठी वापरण्यात येत होता. तर 20 टक्के ऑक्सिजन उद्योगांसाठी वापरण्यात येत होता. परंतु आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये सर्व ऑक्सिजन हा कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.यामुळे ऑक्सिजनची गरज असणारे उद्योग पुढील काही दिवस बंद राहणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे.