Pune : विकेंडच्या सहाव्या रविवारी हडपसर बाजारपेठेत ‘सन्नाटा’

पुणे : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यापार्श्वभूमीवर विकेंडच्या सहाव्या रविवारी हडपसरमधील मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प दिसत होते. हडपसर गांधी चौकातील मजूर अड्ड्यावरही आज सन्नाटा दिसून आला. कोरोना महामारीच्या भीतीने नागरिकही एकमेकांजवळ न येता दूर उभे राहून बोलू लागले आहेत. प्रत्येकजण मास्कचा वापर करीत आहेत, ही जमेची बाजू आहे. पोलीस बंदोबस्त असल्याने रविवार सुटीचा दिवस घरामध्ये एन्जॉय करण्याचे ठरविल्याची चर्चा सुरू होती.

हडपसर गाडीतळ, गांधी चौक, मगरपट्टा चौक, रामटेकडी, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, फुरसुंगी, देवाची उरुळी, लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरातील सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. गल्लीबोळातील रस्तेही मोकळे दिसत होते. एरवी मोकळ्या रस्त्यावर क्रिकेटचा डाव मांडणारी तरुणाईने चक्क घरात दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहण्यात दंग झाली होती. सोसायट्यांमध्ये चिमुकल्यांची क्रिकेटमधील धावपळ दिसत नव्हती. प्रत्येकाच्या तोंडाला मास्क आणि दूर थांबा असे सांगत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

उपनगर आणि परिसरातील उद्याने आणि शाळा-महाविद्यालयांची मैदाने ओस पडली होती. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन पुन्हा पुन्हा वाढत आहे, ते आणखी किती दिवस राहणार का, याविषयी कुटुंबांमध्येही चर्चा सुरू होती. दूरचित्रवाणीवरील आणि वृत्तपत्रांमधील बातम्यांबरोबर सोशल मीडियातील बातम्यांवर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे सध्या तरी कोरोना या एकाच विषयाने गंभीर रूप धारण केले आहे. सोसायटीतील शेजारीपाजारी, गावाकडे, नातेवाईक कोणी पॉझिटिव्ह आहेत का, असतील तर त्यांना काळजी घ्या, वेळेत उपचार करा असा सल्ला भ्रमणध्वनीवरून दिला जात आहे. प्रत्येकजण आहे तेथेच थांबा, फिरू नका, कामाशिवाय कुठेही जाऊ नका असा सल्ला आवर्जून देत आहेत.

कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जागा मिळत नाही, बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड याचीच जास्त चर्चा आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमधून आर्थिक लूट होत आहे, ही बाजूही अनेकांकडून सांगितली जात आहे. उपचार न करताच अवाजवी बिले आकारली जात आहेत. त्यावर कोणाचेही बंधन नाही. कोरोनावर शासनाने लस उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ती मिळविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल आणि लॅपटॉप-कॉम्प्युटरवर नोंदणी करण्यासाठी प्रत्येकजण घाई करीत आहे. प्रशासनाने लस देण्यासाठी थेट नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

शनिवारी (दि. 15 मे) जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग्जवर निसर्गानेच कारवाई केली त्यामुळे तक्रार करण्यासाठी कोणी येत नसल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले होते. आज रविवार सुटी दिवस असल्याने सूर्यनारायणाने सुटी घेतली आहे, त्यामुळे दर्शन झाले नाही. भल्या सकाळी काही ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. मात्र, पोलिसांची गस्त सुरू होताच त्यांनीही घर गाठले. रस्त्यावर खरेदीदार आणि विक्रेते नसल्याने वाहनांची गर्दी नव्हती. औषध आणायची आहेत, दवाखान्यात चाललो आहे, पैसे भरायचे आहेत, नातेवाईकांना उपचारासाठी घेऊन चाललो आहे, गॅस संपला आहे, अशी काही कारणे सांगत दुचाकीस्वार रस्त्यावर येत होते. शनिवार-रविवार कडक निर्बंध असल्याने बाजारपेठा बंद आहेत. मात्र, किरकोळ भाजी, दूध, औषधे, दवाखान्यामध्ये जाणाऱ्यांची रस्त्यावर किरकोळ वर्दळ होती. त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडू नका, स्वतःबरोबर समोरच्या व्यक्तीलाही सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करा, असे आवाहन हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव म्हेत्रे यांनी सांगितले.