Tell me your Story : नैराश्याचे काळोख दूर करण्याचे ‘गुपित’, पुण्यातील तरुणाचे कौतुकास्पद मिशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही नैराश्यात आहात, एकाकीपणा जाणवतोय, मनात आत्महत्येचे विचार येतात का? तर तुम्हाला जाणवणा-या एकटेपणाचे मुख्य कारण म्हणजे तुमच्याजवळ कोणी बोलायला नाही, पण तेच तुमच्याजवळ कोणी बोलणारे असेल, तुमचे म्हणणे ऐकून घेणारा कोणी व्यक्ती भेटला तर तुम्हाला अशा व्यक्तीशी भेटून चांगले वाटेल, हो ना. तुमचे सगळ ऐकूण घेणारा असा एक व्यक्ती तुम्हाला पुण्यात एफसी रोडवर भेटू शकेल. फक्त त्याला एकवेळ भेटून तुमच्या मनातील सार काही त्याला सांगावे लागेल. तुमचे सारे म्हणणे तो शांतपणे ऐकतो, आणि तुम्हा 10 रुपये सुध्दा देतो, तुम्हाला चेष्टा वाटतेय ना, पण चेष्टा नाही, हो खरे आहे.

पुण्यात सध्या सोशल मिडियावर Tell me your Story and i Will give you 10 Rupees असा फलक हातात घेऊन थांबलेल्या मुलाचे फोटो व्हायरल होत आहेत. राज विनायक डगवार असे या तरुणाचे नाव असून तो कात्रज येथील पीसीआयटी ( Pune Institute Of computer technology) मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षात शिकतो. सध्या लॉकडाऊनच्या काळात लोकांमध्ये डिप्रेशन, एकटेपणाची भावना जाणवत आहे. नैराश्य आणि एकटेपणामुळे काहीनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले आहे. असाच एकटेपणा आणि नैराश्य राजला जाणवत होता. आपल्याला कोणाशीतरी बोलायचे आहे. कोणाला तरी मनातील सांगायचे आहे, असे तेंव्हा त्याला जाणवत होते. तेंव्हा त्याने सोशल मिडियावर Tell me your Story and i Will give you 1 Dollar असा परदेशातील एका व्यक्तीचा फोटो त्याने पाहिला अन् त्याने ठरवले की आपणही लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. लोकांना जाणवणारा एकटेपणा दूर करण्यासाठी नैराश्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्याने मदत करण्याचे ठरवले. नुसतेच ठरवले नाही, तर त्याने ते करूनही दाखवले आहे. सध्या वीकएंडला किंवा जमेल तेंव्हा तो पुण्यातील एफसी रोडला फलक हातात घेऊन थांबतो. त्याच्याकडे येणा-या लोकांशी तो आपुलकीने बोलतो. त्यांच्या मनातील दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांना मदत करतो, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो. त्यानंतर त्यांच्याकडे बोलायला येणा-या व्यक्तीला साहजिकच मन मोकळ करून खूप हलके वाटते. त्याच्या या प्रयत्नाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही जण तर त्याच्यासोबत फोटो, सेल्फी काढून त्याचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करून त्याचे कौतुक करत आहेत.

… त्यांच्या मनातील ताण कमी होतो- राज डागवार, विद्यार्थी
सध्या लोकांमध्ये डिप्रेशन आणि एकटेपणाची फिलिंग वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या मनात नको ते विचार येतात. त्यांच्याशी थोडावेळ बोलले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तर त्यांचे मन मोकळे होते. मला त्यासाठी लोकांना थोडासा वेळ द्यावा लागतो. माझ्याकडे येऊन बोलणा-या व्यक्ती खूप नैराश्याच्या गर्तेत असतात. पण थोडा वेळ अनोळखी व्यक्तीशी मनातील सार काही शेअर केल्यामुळे त्यांच्या मनावरील ताण कमी होतो. त्यानंतर त्यांना खूप बरे वाटते. त्यांच्या चेह-यावर दिसणारे हे समाधान पाहून मला आनंद मिळतो.

अन् त्याने माझेही मन जिंकले : आदित्य महाजन, नागरिक
मी राजला एका मुलीची गोष्ट ऐकताना आणि हातात फलक घेऊन उभा असलेले पाहिले आणि माझ्या मनात एक कुतूहल वाढले. मी त्याच्यासोबत बोलायला गेलो. त्यावेळी मला वाटत होते की हा एकतर मानसशास्त्राचा विद्यार्थी असावा, तो काहीतरी प्रोजेक्ट करतोय किंवा कुठल्यातरी एनजीओमध्ये काम करणारा असावा. पण त्याच्याशी बोलून कळाले की असेच काहीच नाही. तो हे सर्व स्वतःहून करतोय. तिथेच त्याने मन जिंकले आणि मी त्याच्याबद्दल सोशल मिडियावर लिहायचे ठरवले आहे. त्याने सुध्दा छान फोटो देत असेच काम पुढे करत राहणार असल्याचे आश्वासन दिले.