Pune : पाणबुड्यांनी स्वारगेट येथील मुख्य पाईपलाईन आतील बाजूने केली दुरूस्त; शहराच्या मध्यवर्ती भागातील पाणी पुरवठा सुरळित होणार – अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचा दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मध्यवर्ती शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पर्वती ते स्वारगेट येथील व्होल्गा चौकापर्यंतच्या मुख्य पाईपलाईनमध्ये सात पाणबुडे उतरवून आतील बाजुने असलेले पाईप जॉईंडरचे लिकेज आज काढण्यात आले. पाणी पुरवठा विभागाने पाणबुड्यांना उतरवून मुख्य पाईपलाईनची आतील बाजूने दुरूस्त करण्याची अधुनिक पद्धत अनेक वर्षांनंतर प्रथमच राबविली असून यामुळे मोठ्याप्रमाणावरील गळती रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी केला आहे.

देखभाल दुरूस्तीसाठी आज शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. यानिमित्ताने पाणी पुरवठा विभागाने शहराच्या मध्यवर्ती भागातील पाणी पुरवठा पुरेशा दाबाने सुरू ठेवण्यासाठी पर्वती पायथा ते व्होल्गा चौकादरम्यानच्या मुख्य वाहनीच्या दुरूस्तीचे काम केले. यासंदर्भात माहिती देताना अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले, की या वाहनीतून शहराच्या मध्यवर्ती पेठांना पाणी पुरवठा होता. ही लाईन ४० वर्षे जुनी असून ठिकठिकाणी लिकेज झाली आहे. मागील दोन तीन महिन्यांपुर्वी मध्यवर्ती शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्यासाठी या वाहीनीमधील लिकेज कारणीभूत ठरले होते. वाहीनीच्या बाहेरील बाजुने निदर्शनास येणारे आठ ठिकाणचे लिकेजेस यापुर्वीच काढण्यात आले होते. मात्र, उर्वरीत काम अर्थात आतील बाजूने असलेले लिकेज आज काढण्यात आले.

आज पाणी बंद ठेवल्याने ही वाहीनी रिक्त करण्यात आली होती. यानंतर ऑक्सीजन मास्क घातलेले सात पाण बुडे हे पाईपमधुन आत उतरले. एका विशिष्ट प्रकारचे सिमेंट वापरून या पाईपचे जॉईंट भरून घेण्यात आले. यासाठी ९० किलो सिमेंटचा वापर करण्यात आला. हे सिमेंट किमान सहा वर्षे टिकते. पाणबुड्यांच्या सहाय्याने वाहीनी आतील बाजूने दुरूस्त करण्याचा तसा प्रसंगी धोकादायक प्रयोग अनेक वर्षानंतर करण्यात आला. यामुळे लिकेज आणखी कमी होउन मध्यवर्ती शहरातील पाणी पुरवठयात पुढील काळात फारशी बाधा येणार नाही, असा विश्‍वास वाटतो, असेही पावसकर यांनी नमूद केले.

पाणी मिटर रिडिंग मोबाईलवर पाठविण्याचे आवाहन

कोरोनामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शहरात यापुर्वी बसविलेल्या पाणी मिटरचे रिडिंग घेणे शक्य नसल्याने प्रशासनाने मिटर धारकांनी मिटरचे रिडींगचे फोटो आपल्या भागातील महापालिकेच्या पाणी मिटररिडरला पाठवावे. यामध्ये व्यावसायीक मिटर धारकांचा प्रामुख्याने समावेश आहे, असे आवाहन अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बसविण्यात येणार्‍या घरगुती वापराचे मिटर संपुर्ण शहरात बसविल्यानंतरच बिलाची आकारणी केली जाणार आहे, असेही पावसकर यांनी नमूद केले आहे.