Pune : 5 महिने ‘दाबून’ ठेवलेली ‘मनुष्यबळ’ पुरवठ्याची 1 कोटींची निविदा अखरेच्या टप्प्यात ‘स्थायी’च्या मंजुरीसाठी; पुरेशी स्पर्धा न होताच काढलेली निविदा संशयाच्या भोवर्‍यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलनासाठी मनुष्यबळ पुरविण्याची निविदा पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हे आहेत. पाच महिन्यांपुर्वी केवळ दोनच निविदा आल्याने नियमानुसार फेरनिविदा काढण्याऐवजी आर्थिकवर्षाच्या अगदी शेवटच्या दिवशी होणार्‍या स्थायी समितीपुढे निविदा मान्यतेसाठी ठेवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागासाठी रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मुलनासाठी मोठ्याप्रमाणावर मनुष्यबळ लागते. हे मनुष्यबळ ठेकेदारी पद्धतीने घेतले जाते. यासाठी दरवर्षी निविदा काढण्यात येते. चालू आर्थिक वर्षातही ऑक्टोबर २०२० मध्ये निविदा काढण्यात आली. १९ ऑक्टोबरला ही निविदा उघडण्यात आली. यामध्ये दोनच ठेकेदारांनी सहभाग दर्शविला आहे. सुमारे एक कोटी रुपयांच्या या निविदेसाठी एका ठेकेदाराने पॉंईंट ००१ तर दुसर्‍याने पॉईंट ०१० टक्के अधिक दर दिला आहे. वास्तविकत: महापालिकेच्यावतीने निविदांमध्ये अधिक स्पर्धा व्हावी यासाठी किमान तीन निविदाधारकांचा सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे. दोनच निविदा आल्यास फेरनिविदा काढल्या जातात. यानंतरही पुरेशी स्पर्धा न झाल्यास सर्वात कमी दराची निविदा मंजुर केली जाते. मात्र, अतिक्रमण कारवाईसाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या निविदेमध्ये दोनच ठेकेदार सहभागी झाल्यानंतरही प्रशासनाने फेरनिविदा काढली नाही. उलट तीच निविदा मान्यतेसाठी ३० मार्चला होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीपुढे ठेवण्यात आली आहे.

मागील पाच महिन्यांत पुरेशी स्पर्धा न झाल्याने फेरनिविदा काढणे सहज शक्य असतानाही प्रशासनाने ती का काढली नाही? अगदी शेवटच्या बैठकीमध्ये ही निविदा आणण्यामध्ये नेमके कोणाचे हित साधायचे होते? असे प्रश्‍न आता उपस्थित होउ लागले आहेत.