Pune : पुण्यात वादळी वारा व पावसामुळे 31 ठिकाणी झाडपडी; घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम शनिवारी रात्री पुण्यातही जाणवला. रात्री सुटलेल्या जोरदार वादळी वार्‍यामुळे शहरात शनिवारी रात्री 9 ते आज (रविवार) दुपारी 4 वाजेपर्यंत 31 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही.

येरवडा, कोंढवा, कोथरुड, हडपसर, मुकुंदनगर, कल्याणीनगर, धनकवडी, कात्रज, कसबा पेठ अशा ठिकाणी या घटना घडल्या. अग्निशामन दलाच्या जवानांनी तातडीने त्या त्या ठिकाणी जाऊन ही झाडे बाजूला केली. पुण्यात काल रात्रीपासून जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर पाऊसही आला होता. जोरदार वारे आणि पाऊस यामुळे 31 ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ४.१ मिमी, पाषाण येथे ३.८ मिमी, लोहगाव येथे ९.६ मिमी तसेच कात्रज ६.२ मिमी, खडकवासला ८.४ मिमी,लोणी काळभोर ४.२ मिमी, बारामती ६.८ मिमी, मोहोळ, सोलापूर ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुणे शहरात रविवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.