पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ : ऑक्सिरिच स्मॅशर्स, निंबाळकर रॉयल्स् संघांची विजयी सलामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पाचव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत ऑक्सिरिच स्मॅशर्स आणि निंबाळकर रॉयल्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. इशा पाथारे आणि सोनल पाटील यांनी सामन्याचा मानकरी हा मान मिळवला.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत इशा पाथारे हिने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑक्सिरिच स्मॅशर्स संघाने केवळ ९२ धावांचा यशस्वी बचाव करून लिजंडस् पँथर्स संघावर ५ धावांनी सनसनाटी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना शिवाली शिंदे २२, मनाली जाधव २१ आणि जाई देवान्नावर ११ यांच्या फलंदाजीच्या जोरावर ऑक्सिरिच स्मॅशर्स संघाने २० षटकात ९ गडी गमावून ९२ धावा केल्या. लिजंडस् संघाच्या भुमिका उंबरजे (२-१५), किरण नवगिरे (२-१३) आणि शरयु कुलकर्णी (२-९) यांनी टिच्चुन गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाचा डाव झटपट गुंडाळला.

या धावसंख्येचा पाठलाग करताना लिजंडस् पँथर्स संघाची सुरूवात चांगली झाली नाही. श्रावणी देसाई (२५ धावा), गौतमी नाईक (१३ धावा), किरण नवगिरे (१२ धावा) आणि आयशा शेख (१२ धावा) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि २० षटकात ८ गडी गमावून ८७ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. इशा पाथारे हिने १७ धावात ३ गडी बाद करून ऑक्सिरिच स्मॅशर्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसर्‍या सामन्यात सोनल पाटीलच्या नाबाद ६० धावांच्या खेळीच्या जोरावर निंबाळकर रॉयल्स् संघाने ऑक्सिरिच स्मॅशर्सचा ९ गडी राखून सहज पराभव केला. ऑक्सिरिच स्मॅशर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमावून ११३ धावा केल्या. यामध्ये शिवाली शिंदे (३६ धावा), कर्णधार मुक्ता मगरे (३० धावा) आणि मनाली जाधव (२२ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाला उत्तर देताना सोनल पाटील हिने ६५ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ६० करून निंबाळकर संघाला १७.४ षटकात विजय मिळवून दिला. सोनलला कर्णधार तेजल हसबनीस (नाबाद ३९) हिने उत्तम साथ दिली. या दोघींनी दुसर्‍या गड्यासाठी ७३ चेंडूत ८७ धावांची नाबाद भागिदारी करून संघाला विजय सलामी मिळवून दिली.