पुनीत बालन स्टुडिओजच्या सामाजिक संदेश देणाऱ्या दोन शॉर्टफिल्मसचा ‘गोवा शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’ मध्ये सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – युवा उद्योजक आणि निर्माते पुनीत बालन यांच्या पुनीत बालन स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘पुनरागमनाय च’ आणि ‘आशेची रोषणाई’ या दोन सामाजिक संदेश देणार्‍या शॉर्टफिल्मसचा सन्मान नुकत्याच पार पाडलेल्या 7 व्या गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल मध्ये करण्यात आला. यामध्ये ‘पुनरागमनाय च’ या शॉर्टफिल्मसाठी सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये यांना ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मला ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महेश लिमये यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेल्या ‘पुनरागमनाय च’ या शॉर्टफिल्म मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळा ठरलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाचे उत्कट चित्रण बघायला मिळते. तसेच या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून डॉक्टर्स, पोलीस, महापालिका प्रशासन आणि पुणेकरांना त्यांनी कोरोनाकाळात दाखवलेल्या धैर्याबद्दल मानवंदना देण्यात आली आहे. या शॉर्टफिल्मची संकल्पना निर्माते पुनीत बालन यांची आहे.

या विषयी बोलताना निर्माते पुनीत बालन म्हणाले, कोरोना, लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आम्ही ‘बाप्पाचं घरीच विसर्जन … सुरक्षित विसर्जन …’, ‘‘पुनरागमनाय च’ आणि ‘आशेची रोषणाई’ या तीन शॉर्टफिल्म मधून सामाजिक संदेश दिला आहे. या तीनही शॉर्टफिल्मला सोशल मीडियावर पुण्यासह जगभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुरस्कार मिळालेल्या या दोनही शॉर्टफिल्मचे लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केले असून क्रिएटिव्ह इनपूट्स विनोद सातव यांचे आहेत. आमची निर्मिती असलेल्या या शॉर्टफिल्मला सोशल मीडियावर रसिकांची आणि पुरस्कारांच्यारूपात समीक्षकांची मिळालेली दाद आगामी कलाकृतींसाठी आम्हाला प्रेरणा देणारी आहे.