अपघात रोखण्यासाठी पशुप्रेमींनी लढवली शक्कल, जनावरांच्या शिंगावर रेडियमचे पट्टे

वसई: पोलिसनामा ऑनलाईन – परिसरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस ही जनावरे वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी पशुप्रेमींकडून नवी शक्कल लढवण्यात आली आहे. अपघात रोखण्यासाठी मोकाट जनावरांच्या शिंगावर रेडियमचे पट्टे मारण्यात आले आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, चिंचोटी-भिवंडी राज्य मार्ग तसेच वसई-विरार शहराला जोडणाऱ्या विविध मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे मुक्तपणे संचार करतानाचे चित्र दिसून आले आहे. मोकाट जनावरे ही चाऱ्याच्या शोधात मुख्य रस्त्यावर येऊ लागली आहेत. ही जनावरे महामार्गावरील असलेल्या दुभाजकांच्या मध्ये उगवलेले गवत खाण्यासाठी रस्त्याच्या मध्ये येत असतात. यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना आपल्या वाहनांचा वेग पटकन नियंत्रणात आणता येत नाही. यामुळे अपघात होतात. काही वेळा अपघातात जनावरांचाही मृत्यू होतो.

यासाठी भूपेश पाटील व रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी द्रुतगती मार्गावरील ढेकाळे, सकवार, खानिवडे टोलनाका व इतर ठिकाणच्या भागांत आढळून येणाऱ्या गाई, बैल यांच्या शिंगावर रेडीएम पट्टी लावली, जेणेकरून अंधारात येणाऱ्या वाहनचालकांना समोर गाय, बैल बसलेयत हे माहीत पडेल व होणाऱ्या अपघातांना आळा बसेल, असे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी सांगितले आहे.