अहो आर्श्चय ! राजस्थानात बर्फवृष्टी

माऊंट अबु : पोलीसनामा ऑनलाइन  –  राजस्थानात बर्फवृष्टी वाचून आर्श्चय वाटले ना़ पण, हे खरे आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजस्थानमधील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे माऊंट अबु या हिल स्टेशनचे किमान तापमान शुन्य अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. तेथे शीतलहर आली असून डोंगरावर सर्वत्र बर्फ जमा झाल्याचे दृश्य दिसून येत आहे.

राजस्थानमध्ये कोरडे हवामान असल्याने अनेक भागात हिवाळ्यात किमान तापमानात मोठी घट होत असते. चुरु हे देशातील सर्वात कमी किमान तापमान नेहमीच आढळून येते. पण यंदा तापमानाचा पारा अधिकच घसरला आहे.

रविवारी सकाळी माऊंट अबु येथे उणे १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चुरु येथे १.६, शिकर २, चितोडगड, पाली येथे ४ अंश सेल्सिअस तर उदयपूर येथे ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राजस्थानमध्ये हिवाळ्यात अनेक उत्सव साजरे केले जातात. त्यात देशपरदेशातून पर्यटक सहभागी होत असतात. माऊंट अबु येथे सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले आहे. त्यांनी या हिरवळीवर पडलेल्या बर्फाचा चादरीचा अनुभव घेतला. काही पर्यटकांनी सांगितले की, आम्ही येथे प्रथमच बर्फ पाहतो आहोत. मनालीसारख्या हिमालयातील हिल स्टेशनला सामान्यपणे बर्फवृष्टी होत असते. पण राजस्थानात प्रथम बर्फवृष्टी पहायला मिळत आहे.