Good News ! कोरोनाबाधित रुग्णांसाठी DRDO चं औषध आलं; आता रुग्ण होतील लवकर बरे…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच देशभरात लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पण आता कोरोनावर रामबाण ठरणारे औषध संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) बाजारात आणले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 2 DG (2-deoxy-D-glucose) हे औषध लाँच केले आहे. यातील 10 हजार लसींची निर्मिती केली आहे. तीन वैद्यकीय ट्रायलनंतर 1 मे, 2021 रोजी DCGI कडून आपातकालीन उपयोग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. DRDO ने लाँच केलेले हे औषध एका पाऊडर स्वरूपात मिळणार आहे. ते पाण्यात मिसळून घेता येऊ शकणार आहे. याबाबतची माहिती संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आज सकाळी साडेदहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राजनाथसिंह यांनी हे औषध लाँच केले.

दरम्यान, DRDO च्या न्यूक्लिअर मेडिसीन इन्स्टिट्यूट अँड अलाईड सायन्सेसने (INMAS) डॉक्टर रेड्डी लॅबसह मिळून हे औषध विकसित केले आहे. डॉ. अनंत नारायण भट्ट यांच्यासह DRDO च्या अनेक वैज्ञानिकांनी मिळून हे औषध निर्मिती केली आहे. पुढील आठवड्यात 1000 मात्राची औषधे पाठवली जाणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

2-DG प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी

DRDO च्या वैज्ञानिकांनुसार 2-DG कोरोनाच्या प्रत्येक स्ट्रेनविरोधात लढण्यास सक्षम आहेत. हे औषध कोरोना व्हायरसच्या प्रोटिनऐवजी मानवाच्या शरीरातील पेशींच्या प्रोटिनमध्ये बदल करते. यामुळे हा व्हायरस पेशींमध्ये राहू शकत नाही. तर अन्य औषधे, लसी या व्हायरसच्या प्रोटीनवर हल्ला करतात. जेव्हा व्हायरसचे म्युटेशन होते, तेव्हा अनेक औषधे परिणामकारक ठरत नाही.