आंदोलनाचं ठिकाण रिकामं करणार होते राकेश टिकैत, मात्र भाजपाच्या आमदारानं बिघडवला सगळा खेळ ?

गाझियाबाद : वृत्तसंस्था – दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसेनंतर गाझियाबाद सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत हे आंदोलन स्थळ रिकामे करण्यास तयार झाले होते. मात्र, भाजपा आमदार नंद किशोर गुर्जर आणि सुनिल शर्मा यांनी आंदोलनात घूसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अचानक सारा खेळ बिघडून गेला, असा आरोप भारतीय किसान युनियनने केला आहे. तर टिकैत यांनी या आमदारांवर सरकारसोबत मिळून कट रचत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान टिकैत यांच्या आरोपांवर गुर्जर यांनी खुलासा केला आहे. टिकैत यांचे आरोप खोटे आहेत. ते तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी माझ्यावर आरोप करत आहेत. माझे लोकेशन तपासा. मी त्यांच्या आंदोलनाच्या 10 किमी परिसरातही हजर नव्हतो, असा दावा गुर्जर यांनी केला आहे. भारतीय किसान युनियनने आमदार गुर्जर आणि सुनिल शर्मावर शेतकरी आंदोलनात गोंधळ घालण्याचे आरोप केले असून त्यांच्या विरोधात कौशांबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश टिकैत यांनी आंदोलन संपवावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा सुरु होती. टिकैत आंदोलन स्थळ रिकामे करण्यास तयार झाले होते. मात्र भाजपा आमदार गुर्जर त्यांच्या 100 हून अधिक समर्थकांना घेऊन आंदोलनात घुसले. यामुळे टिकैत यांना अधिकाऱ्यांसोबतची चर्चा अर्धवट सोडून द्यावी लागली. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी आमदारांना फोन करून या प्रकरणी उत्तर मागविले आहे. नंद किशोर गुर्जर हे गाझियाबादच्या लोनीचे आमदार आहेत. तर सुनिल वर्मा साहिदाबादचे आमदार आहेत.