रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल देणार राजीनामा ?

मुंबई : वृत्तसंस्था – स्वायत्ततेच्या प्रश्नावरून रिझव्‍‌र्ह बँक आणि केंद्र सरकारदरम्यान तणाव वाढला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु  आहे. उर्जित पटेल हे सरकारच्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे वृत्त या वृत्तवाहिनीने दिले आहे. तसेच उर्जित पटेल यांनीही तणावाच्या पार्श्वभूमीवर राजीनाम्यासह सर्व पर्याय खुले ठेवल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
सरकार व रिझर्व्ह बँकेची एकमेकांवर टीका –
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मुंबईतील ए.डी. श्रॉफ या व्याख्यानमालेत गेल्या आठवड्यात अर्थव्यवस्थेबाबत मध्यवर्ती बँक कायम दीर्घकालीन विचार करते, या शब्दात सरकारवर टीका केली होती. त्यांनतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर निशाणा साधला होता. २००८ ते २०१४ दरम्यान, बँकांकडून झालेल्या अनिर्बंध कर्जवाटपाला नियंत्रित करण्यात मध्यवर्ती बँकेची भूमिका अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली होती. बँकिंग व्यवस्थेतील आजच्या बुडीत कर्जाच्या समस्येचेही खापरही त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेवर फोडले होते.
या पार्श्वभूमीवर बुधवारी गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. उर्जित पटेल हे सरकारच्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे वृत्त एका  वृत्तवाहिनीने दिले आहे. उर्जित पटेल यांनी तणावाच्या पार्श्वभूमीवर राजीनाम्यासह सर्व पर्याय खुले ठेवल्याचे या वृत्तात म्हटले आहे. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, अद्याप रिझर्व्ह बँकेच्या वतीने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यास मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
उर्जित पटेल हे रिझर्व बँकेचे विद्यमान गव्हर्नर आहेत. २० ऑगस्ट २०१६  त्यांनी रघुराम राजन यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच नोटबंदीसारखा महत्वपूर्ण निर्णय त्यांच्याच कारकिर्दीत घेण्यात आला आहे.