‘बांडगूळ’ काढल्याने दुर्मीळ ‘वरुण’ वृक्षांना जीवदान, पुण्यात केवळ दोनच वृक्ष शिल्लक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये वृक्षांच्या 530 जातींची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षाच्या जाती इतर कोणत्याही शहरात आढळून येत नाही. पुण्यात नोंदवण्यात आलेल्या 530 जातींपैकी 200 पेक्षा जास्त वृक्ष दुर्मीळ जातींचे आहेत. या जाती लावण्यामध्ये अनेक वृक्षप्रेमींचे मोठे योगदान आहे.

कर्वेनगर येथील आमोद साने यांच्या मित्रमंडळाने अनेक वर्षांपूर्वी कर्वेनगर परिसरातील रस्त्यांवर तब्बल 250 दुर्मीळ वृक्ष लावले होते. त्यापैकी 2 वरुण वृक्षांवर मोठ्या प्रमाणात बांडगुळे वाढल्यामुळे ही झाडे मरणासन्न झाली होती. ही बाब निसर्ग अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी टेलस संस्थेच्या लोकेश बापट यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने ही बांडगुळे वृक्षावरून काढून या दोन वृक्षांना जीवनदान दिले.

दुर्देैवाने या वरुण वृक्षांचा नवसह्याद्री सोसायटीतील तिसरे झाड दोन वर्षांपूर्वीच नागरिकांच्या दुर्लक्षामुळे बळी पडले. या ठिकाणी रस्त्यावरचा पालापाचोळा या वृक्षाच्या तळाशी रचला जात होता आणि तो पेटवला जात होता. शोकांतिका अशी की वरुण म्हणजे पावसाचा देव, तोच या निष्काळजीपणे लावलेल्या आगीत जळून नष्ट झाला.

रस्त्यावरच्या दुर्मीळ झाडांना काही धोका निर्माण होत असेल तर तो दूर करून झाडे वाचवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. सुजाण नागरिकांनी आपापल्या परिसरातील दुर्मीळ झाडे वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा. काही शहरांमध्ये अशा काळजीवाहकाचे नाव आणि फोन नंबर दिलेले फलक लावले जातात. पुण्यातील वृक्षप्रेमी संस्थांनी ही संकल्पना राबवली पाहिजे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक झाडे वादळी वाऱ्यात उन्मळून पडतात. त्यामुळे जीवित होते, वाहनांचे नुकसान होते. अशा घटनांनंतर चर्चा होते. मात्र, चर्चा करण्याऐवजी झाडाला आधार देणे, कुजलेल्या धोकादायक फांद्या काढणे महत्त्वाचे आहे. खोड आतून किडले आहे का, याची तपासणी केली तर अपघात टाळता येतात.

वृक्षांना होणारे धोके पुढीलप्रमाणे

खोडाच्या तळाशी डांबर, कॉंक्रिट किंवा ठोकळे गच्च बसवल्यामुळे मुळांना हवा, पाणी अन्न न मिळाल्याने झाड कमकुवत होते. झाडाला अन्नपुरवठा सालीतून होतो, त्यामुळे साल कापल्यास किंवा खोडावर तार दोरी बांधल्यास झाडाची वाढ खुंटते. तसेच झाडाखाली कचरा जळणे हेदेखील अतिशय गैर आहे. केवळ उद्यान विभागाला दोष देण्यापेक्षा नागरिकांनी झाडामुळे आणि झाडाला होणारे धोके नियमित देखभाल करून टाळले तर पुणे शहरातील जैवविविधतेखेरीज वृक्षप्रेमासाठी कौतुकाने ओळखले जाईल.