फूटपाथवर अडथळा निर्माण करणारे फिडर पिलर्स हटवा

 पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील पदपथांवर अडथळा निर्माण करणारे फिडर पिलर्स संयुक्त खर्चातून येत्या एक ते दीड वर्षात हटवावेत व ते योग्य जागी स्थानांतरीत करण्यात यावे असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.२६) पुणे महानगरपालिका व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

सेनापती बापट रस्त्यावरील प्रकाशभवनमध्ये महावितरण व पुणे महापालिकेची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव, महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल आदीं उपस्थितीत होते.

या बैठकीत शहरातील फुटपाथवरील फिडर पिलर्समुळे पादचाऱ्यांना त्रास होत असून अपघाताची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली. यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महावितरण व महापालिकेने संयुक्तपणे एक समिती स्थापन करून असे धोकादायक ठिकाणांची यादी तयार करावी आणि संयुक्त खर्चाने येत्या एक ते दीड वर्षात ते योग्य जागी स्थानांतरीत करावेत व त्याचा अहवाल वेळोवेळी महापौरांना सादर करण्यात यावा असे निर्देश दिले. तसेच भूमिगत वीजवाहिन्यांसाठी आवश्यक असलेले खोदकाम ही महापालिकेच्या मंजुरीनंतरच करण्यात यावी व ही मंजुरी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित देण्याची कार्यवाही करण्याची सूचना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केली.