…म्हणून लोकसभेचा अंतिम निकाल हाती येण्यास विलंब होणार !

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वत्र आहे. मतमोजणीसाठी राज्यभरात सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वच मतमोजणी  केंद्रांवर  कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पण यंदा प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ याप्रमाणे एका लोकसभा मतदार संघातील ३० मतदान यंत्रासोबत जोडलेल्या व्हीव्हीपॅट मशीन मधील प्रत्यक्ष मोजणी केली जाणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब लागणार आहे.

यंत्रणा सज्ज

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांची मतमोजणी गुरुवारी होत असून मातमोजणीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी आज या पूर्वतयारीचा आढावा घेतला. निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण व त्याबाबतच्या नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. फेरी पद्धतीने मतमोजणी होणार असून फेरीनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची घोषणा केली जाणार आहे.

कोणत्या मतदार संघात किती फेऱ्या ?

— पालघर आणि भिवंडीमध्ये मतमोजणीच्या सर्वाधिक ३५ फेऱ्या होणार आहेत.
— सर्वात कमी १७ फेऱ्या हातकणंगले मतदारसंघात होतील.
— भंडारा-गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात मतमोजणीच्या ३३ निवडणूक निकाल फेऱ्या.
—  बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण ३२ फेऱ्या होतील.
— अमरावती आणि सांगली मतदारसंघात मतमोजणीच्या १८ फेऱ्या होणार आहेत.
— राज्यभरात ४८ लोकसभा मतदारसंघांत ९७ हजार ६४० मतदान केंद्रांवर मतदान झाले असून ८६७ उमेदवार रिंगणात आहेत.

अशी होईल मतमोजणी 

— मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होणार असून सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल.
— मुख्य लिफाफा, मतपत्रिका असलेला लिफाफा आणि प्रत्यक्ष मतपत्रिका याकरील बारकोड स्कॅन करून मतपत्रिकेची खात्री झाल्यानंतरच ती मोजणीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे.
— पोस्टल मतांची खातरजमा करण्यासाठी ईटीपीबीएस पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.
— मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होईल.

अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब 

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत संशय क्यक्त करताना व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के पावत्यांची मोजणी करण्यात यावी यासाठी २३ राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असली तरी या वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान ५ व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ३० व्हीव्हीपॅट यंत्रातील पावत्यांची पडताळणी केली जाणार असून यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब लागणार आहे. व्हीव्हीपॅटमधील मतांच्या मोजणीसाठी कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षणही देण्यात आले असून व्हीव्हीपॅटमधील मते व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात नोंदवली गेलेली मते जुळतात की नाही याची खातरजमा केली जाईल. त्यात तफावत असेल तर व्हीव्हीपॅटमधील मतांची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे.