महसूल विभाग भ्रष्टाचारात पुन्हा अव्वल, तर पोलिसांचा क्रमांक दुसरा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महसूल विभागातील भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. मागील तीन वर्षांपासून भ्रष्टाचारात हा विभाग अव्वल असून या वर्षीदेखील महसूल विभागाने भ्रष्टाचारातील आपला आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर दुसरा क्रमांक पोलिस विभागाचा आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी कितीही पारदर्शकतेच्या गप्पा मारल्या तरी उपलब्ध आकडेवारी पाहिली असता राज्यातील भ्रष्टाचार जैसे थे असल्याचेच दिसून येत आहे. विशेष म्हणजे गृह विभाग मुख्यमंत्र्यांकडे असूनही या विभागातील भ्रष्टाचार कमी झालेला नाही. राज्यातील आठ परिक्षेत्रापैकी पुणे परिक्षेत्र भ्रष्टाचाराच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या आहवालातील यावर्षीच्या आकडेवारीनुसार राज्यातील आठ परिक्षेत्रात भ्रष्टाचारामध्ये अव्वल क्रमांक पुणे (१८२ सापळे) परिक्षेत्राचा लागत आहे. गेल्यावर्षीपेक्षा यात ४ टक्के वाढ आहे. त्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्या नागपूर (११९ सापळे) परिक्षेत्राचा नंबर लागतो. या विभागात गतवर्षीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढ झाली. राज्यात जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ पर्यंत आठ परिक्षेत्रात ८३० सापळे, अपसंपदेचे २२ अन्य भ्रष्टाचाराचे २३ असे गुन्हे दाखल झाले असून यात पुणे परिक्षेत्रात १८२ सापळे, नागपूर परिक्षेत्रात ११९ सापळे, नाशिक परिक्षेत्रात १०४, औरंगाबाद परिक्षेत्रात १०९, अमरावती परिक्षेत्रात ९६, ठाणे परिक्षेत्रात ९७, नांदेड परिक्षेत्रात ८४ सापळे यशस्वी करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड परिक्षेत्रात नांदेड, परभणी, लातूर, हिंगोलीचा समावेश असून नांदेड जिल्ह्यात २५ सापळे, परभणी १७, लातूर व हिंगोली २१ सापळे यशस्वी झाले आहेत. यात ८४ गुन्हे दाखल झाले आहेत.

लाचलुचपत विभागाकडून राज्यात एकूण ८३० सापळ्यात १ कोटी ६७ लाख ९२ हजार ५७८ रुपये जप्त करण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८३० सापळ्यांपैकी महसूल विभागात २०२ सापळे यशस्वी करीत ३५ लाख २० हजार ४०० रुपये सापळ्यातील रकमा जप्त केल्या आहेत. तर पोलिस दलात १७९ सापळ्यात २३ लाख ३८ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.