विखे-पाटलांच्या टीकेचा महसूलमंत्री थोरातांनी घेतला समाचार, म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा नेते राधाकृष्ण विखे -पाटील यानी काल मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सध्या एकच काम दिले आहे, ते म्हणजे केंद्रावर आरोप करा आणि आपल पाप झाका, अशी टीका करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. तसेच नगर जिल्ह्यात पालकमंत्र्यासह 4 मंत्री आहेत, पण ह्या मंत्र्याचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या टीकेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातल्या मंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याला फार महत्व देण्याची गरज नाही. त्यांना नियतीने दिलेली विरोधी पक्षाची भूमिका ते बजावताहेत, अशा शब्दात थोरात यांनी विखे पाटलांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

संगमनेरमध्ये शनिवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर मंत्री थोरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, देशासह राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटातही काही लोक राजकारण करत आहे हे दुर्दैवी आहे. वास्तविक अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वपक्षीय मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र येत लढा देण्याची गरज आहे. सरकारच्या निर्णयाला नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. याबाबत राज्य सरकार व स्वतः मुख्यमंत्री जातीने लक्ष घालून निर्णय घेत आहेत.

नगर जिल्ह्यात दोन दिवसात कोरोनाने झालेल्या मृत्यूमूळे निर्माण झालेले चित्र भयानक आहे. मात्र हे केवळ नगरमध्येच आहे असे नाही, तर सगळीकडेच आहे. त्यामुळे कडक निर्णय घ्यावे लागतील. राज्यातील मिनी लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध तर राज्यकर्त्यांचा आग्रह या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, गेल्या वर्षात व्यापा-यांचे मोठे नुकसान झाले, हातावर पोट असलेल्यांची परिस्थिती अतिशय अवघड झाली असली तरी हे मानवतेवरील संकट आहे हे विसरु नये संकटाला सामोरे जावे लागणार आहे.