या गावातील तरुण-तरुणींना का राहावे लागते लिव इन मध्ये

रांची : वृत्तसंस्था – तरुण तरुणींनमध्ये लिव इन मध्ये राहण्याचे फॅड आहे. सध्या अनेक प्रेमी युगुलं लिव इन मध्ये राहतात पण  झारखंडमधील एका गावात अनेक जोडपी नाईलाजाने अशा नात्यामध्ये राहत आहेत. त्यांच्याकडे लग्नाचा खर्च करायला व गावजेवणं घालायला पैसेच नाहीयेत. गुमला येथे हे गाव असून येथे अनेकज ण २० ते ३० वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत आहेत. झारखंडमधील ओरांव, मुंडा आणि हो नावाच्या आदिवासी जमातीमध्ये अशा प्रकारची जोडपी पाहायला मिळतात.
वर्षानुवर्ष लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या या जोडप्यांची सामान्यांप्रमाणे लग्न करण्याची इच्छा आहे. यामुळे एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत नुकतेच येथील 132 जोडप्यांचे लग्न लावून दिले. तसेच यावेळी परंपरेनुसार गाव जेवणही घातले. यामुळे हे आदिवासी गावकरी भलतेच आनंदात आहेत.

लग्न न करता एकत्र राहण्याच्या या पद्धतीला येथे धुकुआ असे म्हणतात. यात महिला लग्न न करता समाजाच्या परवानगीने पुरुषाबरोबर राहू शकते. तिला धुकनी म्हणजे लग्न न करता पुरुषाच्या घरात राहणारी बाई असे संबोधले जाते. विशेष म्हणजे लग्न न करता पुरुषाची पत्नी म्हणून वावरणाऱ्या या धुकनी म्हणजे बाईला पतीवर व मुलांवर अधिकार गाजवण्याचा अधिकार नसतो. ती फक्त त्यांची सेवा करू शकते व प्रजनन करू शकते. तिला सामान्य किंवा लग्न करून आलेल्या महिलांबरोबर ऊठबस करण्यास मनाई असते.