25 दिवसांपासून पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये 2 कोंबडे, सट्टेबाजांसोबत पकडून केलं होतं बंद

पोलीसनामा ऑनलाईन : तेलंगणामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जेथे दोन कोंबडे गेल्या 25 दिवसांपासून पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये बंद आहेत आणि आपल्या सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या सट्टेबाजांमुळे त्यांना येथे पकडून आणण्यात आले होते, ते तर जामिनावर सुटले परंतु कोंबडे लॉकअपमध्येच राहिले.

ही घटना तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्याची आहे, जिथे म‍िद‍िगोंडा पोलीस ठाण्यात गेल्या 25 दिवसांपासून या कोंबड्यांना लॉकअपमध्ये बंद करण्यात आले आहे. 10 जानेवारी रोजी पोलिसांनी त्यांना पकडले होते.

वास्तविक, संक्रांतीच्या उत्सवात कोंबड्यांच्या झुंजीचा खेळ सुरू होता ज्यावर सट्टेबाजी चालू होती. पोलिसांनी या सट्टेबाजांवर रेड टाकली आणि 10 लोकांना घटनास्थळावरून अटक केली. सोबतच दोन कोंबडे आणि एक दुचाकीही जप्त केली. नंतर सर्व सट्टेबाज जामिनासह बाहेर पडले, परंतु कोंबड्यांवर क्लेम करण्यास कुणीही आले नाही. हे कोंबडे प्रकरणाचा पुरावा म्हणून पोलिस ठाण्यात बंद आहेत.

याबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की या कोंबड्यांना केवळ खटल्याच्या सुनावणीनंतरच सोडले जाऊ शकते. कोंबड्यांना सोडण्याचे आदेश मिळाल्यानंतर त्यांची बोली लावतील आणि जो जास्त बोली लावेल, त्याला हे दोन्ही कोंबडे दिले जातील.