Sachin Vaze : वर्षा बंगल्यावर हालचालींना वेग; DG, आयुक्तांसोबत CM ठाकरेंची मध्यरात्रीपर्यंत चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असून कोणाचीतरी विकेट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.16) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. ही बैठक मध्यरात्रीपर्यंत सुरु होती.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या हायलेव्हल बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त परमबीर सिंह, गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब हे उपस्थित होते. यांच्यामध्ये सचिन वाझे प्रकरणावर चर्चा झाली. रात्री 9 वाजता सुरु झालेली बैठक सुमारे चार तास सुरु होती. ही बैठक मध्यरात्री संपल्यानंतर मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरुन परतले.

अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या स्फोटकांच्या कटाची सुत्रे एका आयपीएस अधिकाऱ्याने हलवली असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. दरम्यान, एनआयएने सचिन वाझे हे वापरत असलेली मर्सिडीज कार जप्त केली. या कारमधून बॅग,डायरी, शर्ट आणि पाच लाख रुपयांची रोख रक्कम एनआयएने जप्त केली आहे.

सचिन वाझेंना न्यायालयाचा दणका

सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. वाझे यांनी एनआयए कोर्टात केलेले तीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावले आहेत. एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि अटक बेकायदेशीर असल्याचा दावा कोर्टाने अमान्य केला आहे. फक्त वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टाने मान्य केली आहे. याशिवाय चौकशीच्या वेळी वकिलांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.