NIA ची मोठी कारवाई ! सचिन वाझेसोबत हॉटेलमध्ये दिसलेल्या ‘त्या’ महिलेला घेतलं ताब्यात

पोलीसनामा ऑनलाईन : अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे याला अटक केली आहे. त्यानंतर आता वाझेसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दिसलेल्या महिलेचा शोध लागला असून NIA ने तिला गुरुवारी (दि.1) संध्याकाळी ताब्यात घेतले आहे. ही महिला ही 16 फेब्रुवारी रोजी दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये वाझेसोबत दिसली होती. तसेच यावेळी 5 मोठ्या बॅगा त्यांच्यासोबत दिसल्या होत्या. या बॅगामध्ये वाझे पैसे भरून घेऊन जात होता.

अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी NIA ने गुरुवारी दुपारी दक्षिण मुंबईतील एका हॉटेल आणि क्लबचा तपास केला. तर NIA च्या दुस-या पथकाने ठाण्यातील मीरारोड येथील एका फ्लॅटवर धाड टाकली. याच फ्लॅटवर ही महिला राहत होती. पण गेल्या 2 आठवड्यापासून फ्लॅट बंद होता. चौकशीनंतर या महिलेला संध्याकाळी विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला वाझेची निकटवर्तीय आहे. NIA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला वाझेचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी काम करत होती. ती 2 ओळखपत्रांचा उपयोग करत हे काम करत होती. आणि तिच्याकडे नोटा मोजण्याची मशीनही होती. जी मागच्या महिन्यात वाझेच्या मर्सिडीजमध्ये आढळली होती. दरम्यान स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या प्रकरणी वाझेची भूमिका संशयास्पद आहे, NIA ला वाझेविरोधात सबळ पुरावे सापडत आहेत. 3 एप्रिलला वाझेची कोठडी संपत आहे. त्यावेळी वाझेला पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.