API सचिन वाझेंना CIU चा इन्चार्ज करण्यासाठी मास्टर ‘प्लॅन’?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – अंबानीच्या घराजवळ स्फोटक सापडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना CIU प्रभारी केल्यापासून मुंबई गुन्हे शाखेत प्रचंड असंतोष पसरला होता. वास्तविक वाझेंच्या नियुक्तीपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे 2 अधिकारी सीआययूमध्ये होते. वाझेंचा रस्ता मोकळा करण्यासाठी सुरुवातीला या दोन्ही अधिका-यांना योजनाबध्द पध्दतीने बाजूला केले गेले. खरेतर निलंबित अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेतल्यानंतर सुरुवातीला कंट्रोल रूम, एसबी आदी ठिकाणी नियुक्ती दिली जाते. पण हे सर्व नियम डावलून वाझेंना गुन्हे शाखेच्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणा-या सीआययुची जबाबदारी दिली. या प्रकरणी नाराज अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही वाझे यांना कायम ठेवले होते.

ख्वाजा युनुस प्रकरणात निलंबित वाझेंना जून 2020 रोजी पुन्हा सेवेत घेतले. त्यानंतर त्यांना थेट सीआययूच्या प्रभारी पदी नियुक्ती केली गेली. या विभागाला गोपनीय कारवाई किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारीच सोपवली जाते. मुंबई गुन्हे शाखेने या आधारावरच अनेक उपलब्धी मिळवल्या आहेत. अशा परिस्थितीत वाझेंना सीआययूमध्ये नियुक्ती दिल्याने गुन्हे शाखेत असंतोष होता. यासंदर्भात तक्रारी करणाऱ्यांना गप्प केले होते. वाझे यांनी सीआययूमध्ये एन्ट्री करताच संशयास्पदरीत्या कामाला सुरुवात केली. याबाबत काही अधिकाऱ्यांनी बेनामी तक्रारी करून वरिष्ठांना वाझेपासून सावध राहण्यास सांगितले होते. वाझे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फटकून वागत होते. थेट पोलीस आयुक्तांना संपर्क करीत होते. त्यामुळे संपूर्ण गुन्हे शाखेने त्यांच्यापुढे गुडघे टेकले होते, असे एका अधिका-याने सांगितले.