सदाभाऊंचा फोन न उचलणे तहसिलदारांना पडले महागात

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेला कॉल कराडचे तहसिलदार राजेश चव्हाण यांनी उचलला नव्हता. नेमके हे तहसिलदार महाशय आढावा बैठकीत सदाभाऊंना सापडले आणि त्यांनी तहसिलदारांची सर्वांसमक्ष खरडपट्टी काढली. बैठकीला उपस्थित असलेल्या अन्य एका आमदारांनीही तहसिलदारांना चांगलेच झापले. संतापलेल्या सदाभाऊंनी या तहसिलदारांची एक वेतनवाढ रोखण्याचे आणि कार्यवाहीची माहिती वेळोवेळी देण्याचे आदेश याबैठकीतच जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिल्याने सर्वच मुजोर अधिकाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

सातारा जिल्ह्यात दुष्काळ निवारण नियोजन आणि टंचाई आढावा बैठक झाली. बैठकीला सातारचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आ. जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी संजय पाटील (रोहयो), निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर त्याचबरोबर सर्वच खातेप्रमुख आणि तहसीलदार उपस्थित होते.

सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मराठा उपोषण सुरूच राहणार 

सहपालकमंत्री तथा कृषी राज्यमंत्री खोत यांनी खंडाळा, कोरेगाव, माण आणि खटावचा आढावा घेतल्यानंतर कराडचा आढावा घेताना खोत यांनी कराडचे तहसीलदार कोण आहे, असे विचारले. यावेळी मागे बसलेले कराडचे तहसिलदार राजेश चव्हाण उभे राहिले. राजेश चव्हाण यांना बघताच सदाभाऊ खोत यांनी ओळखले की आपला मोबाईल न घेणारा तो हाच अधिकारी. चव्हाण यांनी ओळख सांगताच संतापलेले सदाभाऊ म्हणाले, तुम्हाला माझा फोन उचलायला लाज वाटते काय. तुमची नेमकी अडचण तरी काय आहे. जिल्हाधिकारी मॅडम फोन उचलतात आणि तुम्ही का उचलत नाही. अशाप्रकारे खोत हे तहसिलदारांची खरडपट्टी काढत असताना आ. गोरे यांनीही  बॅटींग सुरू केली. तुम्ही तहसीलदार म्हणून काय सांगता. तुमच्याकडे अमूक एकाचा अथवा अन्य कोणाचा नंबर सेव्हच असायला हवा, असे काही नाही. कोणाचाही फोन असू द्या. तो तुम्हाला उचलावाच लागेल. तुम्ही कोणाचे फोन उचलायला आला आहात, असे आ. गोरे म्हणाले.

दरम्यान, तहसीलदार चव्हाण यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह नसल्याने तो उचलला नाही असे सांगितले. ते ऐकताच सदाभाऊ आणखी भडकले. अहो, तुमच्याकडे माझा क्रमांक सेव्हच हवा असे काही नाही. ०२२ क्रमांकाने सुरु होणारे नंबर दिसले की ते मंत्रालयातील आहेत, असे समजा आणि लगेच उचला. आता अधिवेशन सुरु होणार आहे. आम्हाला आमदारांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात त्यासाठी माहिती लागते. हे बरोबर नाही. तुम्ही वशिल्याने तहसिलदार झाला आहात का, अशा कठोर शब्दात खोत यांनी तहसिलदार चव्हाण यांची हजेरी घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडेही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.