प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची संत परंपरा दिल्लीच्या राजपथावर !

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – प्रजासत्ताक दिनी (दि. 26 जानेवारी) दिल्लीच्या ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारीत सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चित्ररथ बांधणीचे काम नागपूर येथील टीम शुभचे प्रमुख राहुल धनसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. एकूण 30 कलाकार हा आकर्षक चित्ररथ उभारत आहेत.

महाराष्ट्रासह अन्य निवड झालेल्या राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याच्या अस्मितेचे दर्शन पुन्हा एकदा घडणार आहे. कँटॉन्मेंट परिसरातील रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती खास आकर्षण ठरत आहेत.यंदा प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते.

असा आहे चित्ररथ
दिल्लीच्या राजपथदावर दिसणा-या चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती साकारली आहे. त्यांच्या मूर्तीसमोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी 8 फूट उंचीचे दोन पुतळे उभारले आहेत. या पाठोपाठ कोट्यवधी भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कडेवर हात असणारी 8.5 फूट उंचीची लोभस मूर्ती उभारली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारला आहे. सर्व पुतळ्याची बांधणी झाली असून त्यावर रंगकाम सुरु आहे.

चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या प्रतिकृती असणार आहेत. या प्रतिकृती बनविण्याचे काम सुरु असून त्यांच्या बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे धनसरे यांनी सांगितले.