समीर भुजबळांचा जामीन नाकारला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिकचे माजी खासदार तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अंतरिम जामीन मुंबई हायकोर्टाने नाकारला आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी १५ मे रोजी ठेवण्यात आली आहे.

समीर भुजबळांना तोपर्यंत अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी मागणी भुजबळ यांच्यावतीने केली गेली. तसेच या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या छगन भुजबळ यांनाही नुकत्याच देण्यात आलेल्या जामिनाचा दाखला देत, समानतेच्या मुद्यावर जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी समीर भुजबळ यांच्या वतीने करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्यातील कलम 45 घटनात्मकदृष्ट्या वैध नसल्याचा निकाल दिल्यानंतर आत्तापर्यंत 53 जणांना जामीन देण्यात आला आहे. केवळ आपणच जामिनापासून वंचित असल्याचा युक्तीवाद समीर भुजबळांतर्फे करण्यात आला. पण हायकोर्टाने समीर यांना कोणताही दिलासा न देत सुनावणी 15 मे रोजी ठेवली आहे. पुढील सुनावणीला ईडीला त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी समीर भुजबळ यांना कारागृहातच राहावे लागणार आहे.