सख्खा भावानेच केला भावाचा निर्घृण खून; मजुरांना शिवीगाळ पडलं महागात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – द्राक्षबागेत कामासाठी येणा-या मजुरांना वांरवार शिवीगाळ केल्याने सख्ख्या लहान भावानेच दारुच्या नशेत मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी पार घालून निर्घृण खून केला आहे. करोली (ता.मिरज) येथे मंगळवारी (दि. 16) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मनोज वसंत इंगवले-देशमुख (वय 42) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी नितीन वसंत इंगवले-देशमुख (वय 40 ) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही जप्त केली आहेत. याप्रकरणी मनोज याचा चुलत भाऊ विश्वजीत इंगवले-देशमुख याने फिर्याद दिली आहे.

मिरज ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज आणि नितीन दोघे सख्खे भाऊ आहेत. दोघांनाही दारुचे व्यसन होते. इंगवले-देशमुख कुटुंबाची करोली येथे वडीलोर्जीत 3 एकर शेती असून वडीलांनी दोघांना ती वाटून दिली आहे. 3 एकर जमिनीपैकी वाट्याला येणार्‍या दीड एकरमध्ये नितीनने द्राक्षबाग लावली आहे. परंतु मयत मनोज हा नितीन याच्या द्राक्षबागेत कामासाठी येणार्‍या मजुरांना वारंवार शिवीगाळ करत होता. तसेच मंगळवारी सकाळी मनोजने द्राक्षबागेत कामासाठी आलेल्या मजुरांना शिवीगाळ करून येथे पुन्हा यायचे नाही, असे म्हणून हाकलून दिले होते.

याबाबत नितीनने मनोजला जाब विचारल्यानंतर दोघांत वाद झाला होता. वडीलांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. मात्र मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दोघांनी दारू पिल्यानंतर पुन्हा दोघांत सकाळी घडलेल्या प्रकारावरुन वादावादी झाली. यावेळी रागाच्या भरात नितीनने मनोज यांच्या डोक्यात पार आणि सळीने मारहाण केली. या मारहाणीत डोक्यात वर्मी घाव बसल्याने तसेच रक्तस्त्राव झाल्याने मनोज हा जागीच ठार झाला. मनोज ठार झाल्याचे लक्षात येताच नितीन याने घटनास्थळावरुन पलायन केले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अशोक विरकर, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून करून पळून गेलेल्या नितीन याला पोलिसांनी मणेराजुरी येथून अटक केली आहे.