Sangli : दुर्दैवी ! आईसह 2 चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू; घटनेने परिसरात खळबळ

विटा (सांगली) : पोलीसनामा ऑनलाइन – एका महिलेचा दोन मुलांसह विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. लेंगरे (ता. खानापूर) येथे शुक्रवारी (दि. 14) रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. महिलेने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

उजिता जोतिराम शिंदे (वय 30), मुलगा केदारनाथ (वय 1), मुलगी रिया (वय 6 तिघेही रा. लेंगरे, बोबडेवस्ती ) अशी मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेंगरे येथील बोबडे वस्तीत राहणारे जोतीराम शिंदे अमरावती येथे पोलिस दलात नोकरीला आहेत. त्यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांची पत्नी उजिता ही सातारा जिल्ह्यातील कलेढोण येथील राहणारी आहे. शुक्रवारी रात्री उजिता हिने केदारनाथ आणि रिया या दोन मुलांसह बोबडे वस्तीजवळील पाटील वस्तीतील विहिरीत उडी टाकली. त्यात तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद विटा पोलिस ठाण्यात केली आहे. याबाबत पोलिस पाटील पुष्पा बोबडे यांनी फिर्याद दिली आहे.