सानिया मिर्झा म्हणते – ‘खेळाच्या मैदानात करू की कमबॅक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्व मातांना उद्देशून सानिया मिर्झाने अलीकडेच आई म्हणून एक पत्र लिहिलंय. त्यात ती स्वत:च्या आईपणाचा प्रवास, खेळातलं पुनरागमन, त्यासाठी तिला मिळालेली प्रेरणा व आई असलेल्या बाईच्या स्वप्नाबद्दल मोकळेपणानं बोललीय. म्हणालीय, खेळाच्या मैदानात कमबॅक करेन.

सानिया लिहिते, आपली स्वप्नं पूर्ण करा किंवा मातृत्व स्वीकारा. या दोन पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करण्याची द्विधा स्थिती अनेक महिलांसमोर येते. पण, मूल झाल्यानंतरही आपलं मूल सांभाळून आपलं करिअर, आपलं काम, त्याच पॅशनने करणार्‍या प्रत्येकीचं मला कौतुक वाटतंय.

याबाबतीत माझा मोठा आदर्श सेरेना विल्यम्स असून ती कोर्टवर एक खेळाडू, अन् घरी एक आई म्हणून सगळी परिस्थिती कशी हाताळतेय, हे बघून माझ्यातही कोर्टवर पुन्हा येण्याची जिद्द निर्माण झालीय. जेव्हा महिला आपलं घर सांभाळून जिद्दीच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण करते, तेव्हा ती चर्चेचा विषय ठरते. पण, खेळाडू महिला जेव्हा आई होते, तेव्हा ती पुन्हा मैदानात परतू शकेल का?, हाच प्रश्न अनेकांना पडतो.

बाळंतपण, आईपणाच्या जबाबदार्‍या सांभाळून पुन्हा मैदानात परतणं सोपं नाही. पण, मागील काही वर्षांत हे चित्रही बदललंय. टेनिसमध्ये कितीतरी जणींनी उत्तम कमबॅक केलंय.

मी जेव्हा गर्भवती होते तेव्हा आईपणाचं एक चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं होतं. पण, प्रत्यक्षात मूल झाल्यानंतर त्या चित्रातल्या कितीतरी गोष्टी बदलल्यात. आई होण्याचा खरा अर्थ कळलाय.

आई होणं, ही बाब एक माणूस म्हणून तुम्हाला खूप बदलवते. बाळंतपणानंतर आपलं शरीर काय प्रतिक्रिया देईल? ही गोष्ट जशी व्यक्तिविशिष्ट आहे तशीच अनिश्चित देखील आहे. गरोदरपणात माझं 23 किलो वजन वाढलंय.

मी पुन्हा खेळू शकेन की नाही ? याची मलाच साशंकता होती. पण, मी उमेद सोडलेली नाही. व्यायाम आणि आहार नियमांचं काटेकोर पालन करून मी 26 किलो वजन कमी केलंय. मला कोर्टवर पुन्हा परतायचं होतं अन् मी परत आले..’