संकष्टी चतुर्थीस चिंतामणी मंदिर दर्शनासाठी बंद

थेऊर : पोलीसनामा ऑनलाईन – अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेले श्री चिंतामणी गणपती कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संकष्टी चतुर्थीस भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे तसा शासकीय आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले आहेत.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट उसळली असून मोठ्या प्रमाणावर रुग्ण संक्रमित होत आहेत यात पुणे जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून दररोज सहा हजारावर रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे तरीही अनेक जण याकडे दुर्लक्ष करत आहेत सार्वजनिक उत्सव व कार्यक्रमावर निर्बध घालण्यात आले आहेत.

येत्या बुधवारी दि.३१ मार्च रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने थेऊर येथे हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात त्यामुळे अशावेळी कोरोना संसर्गाचा धोका मोठा असतो त्यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून या दिवशी पूर्ण दिवसभर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांनी आपापल्या घरी राहूनच देवाची आराधना करावी असे आवाहन हवेलीचे अप्पर तहसीलदार प्रविणकुमार चोबे यांनी केले आहे.

देवस्थानचे नियमित होणारे धार्मिक विधी नेहमीप्रमाणे पार पडतील असे व्यवस्थापक मंगलमूर्ती पोफळे यांनी सांगितले.