ऐन अंगारकी संकष्टीला गणपतीला सांताक्लॉजची टोपी आणि दाढी ; अकोल्यात तणाव

अकोला : पोलीसनामा पोलीसनामा – राज्यभरात सर्वत्र नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र गायगाव येथील गणपतीच्या मूर्तीला सांताक्लॉजची टोपी आणि दाढी घातल्याने अकोल्यात एकच तणाव निर्माण झाला होता. गणपतीला सांताक्लॉजच्या वेशात सजवल्याने बजरंग दल कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यापूर्वी कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या मूर्तीला घागरा घातल्यामुळे मोठा वाद निर्मण झाला होता.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अंगारकी चतुर्थी असल्यामुळे गायगावच्या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती. दर्शनासाठी येणाऱ्या गणपतीच्या मूर्तीला सांताक्लॉज प्रमाणे पांढरी दाढी आणि डोक्यावर लाल टोपी घातल्याचं पहावयास मिळालं. या प्रकाराची माहिती मिळताच अकोल्यातील बजरंग दल कार्यकर्ते थेट मंदिरात धडकले आणि मंदिराच्या ट्रस्टींबरोबर त्यांनी वाद घातला. या प्रकारामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं त्यांनी म्हटलंय.

कार्यकर्त्यांनी पोलिस तक्रार करण्याची तयारी दर्शविताच मंदिराच्या ट्रस्टीने गणपतीला केलेली सांताक्लॉजची वेशभूषा काढून टाकली. घडल्या प्रकारानंतर तणाव निर्माण झाल्याने गायगाव मंदिर परिसरात अकोला पोलिसांचं एक पथक तैनात करण्यात आलं आहे.

गणपतीला सांताक्लॉजची टोपी आणि दाढी लावून मंदिराला चर्च सारखं सजवल्याचा आरोप अकोला बजरंग दलाचे जिल्हा संयोजक संजय रोहनकार यांनी केला असून, या प्रकारामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Loading...
You might also like