खुद्द सरदार वल्लभभाई पटेल यांचाच होता पुतळ्यांना विरोध 

पोलीसनामा ऑनलाईन  – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चे अनावरण मोठ्या दिमाखात आज करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला . हा पुतळा नर्मदा नदीच्या काठी बांधण्यात आला आहे.  मात्र १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याविषयी गेल्या  काही महिन्यापासून  चर्चा सुरु आहे. तब्बल २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करुन हा पुतळा बांधण्यात आला आहे. पण खुद्द सरदार वल्ल्भभाई पटेल यांचा पुतळा बांधण्याच्या संकल्पनेलाच विरोध असल्याचे एका दस्ताऐवजावरून पुढे आले आहे.
एवढा खर्च करून हा पुतळा  बनवण्यात आला आहे. या खर्चावरून विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक  झाले आहेत.  तसेच अनेक तज्ञ  व्यक्तींनी देखील याला विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही तर खुद्द सरदार पटेल यांचा एखाद्या व्यक्तीचा पुतळा किंवा स्मारकं बांधण्याला विरोध होता हे त्यांनीच लिहीलेल्या एका लेखामधून समोर आले आहे.
काय म्हणाले होते सरदार वल्लभभाई पटेल-
भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार पटेल यांचा हा लेख आता ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर बरोबर दोन आठवड्यांनी म्हणजे १४ फेब्रुवारी १९४८ रोजी पटेल यांनी याच विषयासंदर्भात एक लेख लिहीला होता. ‘दु:ख करत बसणे पुरे झाले आता कामाला लागा’ अशा मथळ्याखाली पटेलांनी हा लेख लिहीला होता. यामध्ये त्यांनी गांधीजींच्या उपदेशांबरोबरच त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडलेला होता. ‘गांधीजींच्या नावाने मंदिर बांधणे किंवा त्यांची मूर्तीपूजा करणारी स्मारके बांधण्याला माझा सक्त विरोध आहे. अशा प्रकरणांमध्ये मी कायमच माझी मते स्पष्टपणे मांडली आहेत. अशी स्मारके बांधणाऱ्यांना किंवा तसा विचार करणाऱ्यांना असे न करण्याचा सल्ला मी देईन. त्यांनी अशाप्रकारे स्मारके बांधण्याचे काम करु नये अशी विनंती मी त्यांना करतो’ असे या लेखात म्हटले होते.
विरोधाभास
तब्बल २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करुन हा पुतळा बांधण्यात आला आहे . यासंदर्भातच ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘समकालीन’ या वृत्तपत्रामध्ये संपादक आणि सेण्टर फॉर स्टडीज अॅण्ड रिसर्च ऑन लाइफ अॅण्ड वर्क्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल (सेरलिप) चे माजी नियंत्रक असणाऱ्या डॉ. हरी देसाई यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. ‘काही हजार कोटी रुपये खर्च करुन पटेलांचा हा पुतळा उभारण्यात आला असतानाच आपल्याला ही गोष्टही लक्षात घेणे गरजेचे आहे की, पटेल यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्याकडे केवळ २६२ रुपये होते.’ तसेच त्यावेळी सरदार पटेलांकडे असणाऱ्या संपत्तीचा ३५ लाखांचा धनादेश त्यांची मुलगी मणिबहन यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंना परत केला होता असेही देसाई यांनी सांगितले.