सोलापूर जिल्ह्यातील सरपंच निवड 8 फेब्रुवारीला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील बहुतेक सरपंचांची निवड 10 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड 8 फेब्रुवारीला होणार असून त्यासंबंधीचे आदेश सोमवारी (दि. 1 फेब्रुवारी) काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. सरपंच निवड होण्यापूर्वी संबंधितांना तीन दिवसाची नोटीस दिली जाणार आहे. नोटीस देऊन तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी होणार सरपंच निवडीची सभा; अर्ज भरणे, माघार आणि अंतिम निवड त्याच दिवशी होणार आहे.

राज्यातील 28 हजार 875 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली आहे. 18 जानेवारीला मतमोजणी झाली असून तिथून पुढे 30 दिवसांत सरपंच, उपसरपंच निवड होणे बंधनकारक आहे. आता सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटांकडे त्या प्रवर्गातील सदस्य नाही, खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या संबंधित मागास प्रवर्गातील उमेदवारास सरपंच होण्याची संधी मिळाली, सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतरही विरोधी गटातील मागास प्रवर्गातील सदस्याला सरपंचपदी लॉटरी लागली, असेही काही ठिकाणी पाहायला मिळाले आहे.

दुसरीकडे, सरपंच आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील दोन- चार सदस्य सत्ताधारी गटाकडे असल्याने सर्वात पहिले सरपंच कोण, असा वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशा नाराज सदस्यांचा अचूक वेध घेऊन विरोधकांनी त्याला थेट सरपंचपदाची ऑफर देऊ केली आहे. त्यामुळे सरपंच निवड होईपर्यंत नेमका कोण आणि कोणत्या गटाचा सरपंच होणार? हे निश्‍चित सांगणे कठीण झाले आहे. दरम्यान सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकजण विरोधकांसोबत फिरायला गेले असून, त्यांचा शोध सुरू आहे.