सातारा : चिंचनेर निंब येथील जवान सिक्कीममध्ये हुतात्मा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – गस्त घालताना अचानक वाहन खोल दरीत कोसळून चिंचनेर निंब (ता. सातारा) येथील जवान सुजित नवनाथ किर्दत (वय 38) हे सिक्कीम येथे कार्यरत असताना हुतात्मा झाले. गस्तीदरम्यान झालेल्या अपघातात त्यांचे इतर सहकारी देखील हुतात्मा झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली आहे. किर्दत यांच्या पार्थिवाची प्रतिक्षा आता ग्रामस्थांना लागून राहिली आहे. दीड महिन्यापूर्वीच किर्दत यांनी सुट्टी संपवून पुन्हा सेवेत दाखल झाले होते.

सुजित किर्दत 2002 मध्ये भारतीय सैन्य दलाच्या अभियांत्रिकी रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. सध्या त्यांची नेमणूक सिक्कीम येथे होती. रविवारी दुपारी किर्दत हे सहका-यासमवेत गस्त घालत होते. गस्त घालताना त्यांचे वाहन अचानक दरीत कोसळले. यात किर्दत यांच्यासह त्यांचे सहकारी हुतात्मा झाले आहेत. त्यांचे पार्थिव मंगळवारी सांयकाळी पुणे येथील विमानतळावर आणले जाणार आहे. त्याठिकाणी त्यांना लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव साता-याकडे रवाना होणार आहे. हुतात्मा किर्दत यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, वडिल, भाऊ असा परिवार आहे.

किर्दत कुटुंबाला सैनिकी परंपरा
हुतात्मा किर्दत यांच्या घराला सैनिकी परंपरा आहे. त्यांचे वडिल सुध्दा भारतीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. सुजित यांचे थोरले बंधू सुध्दा लष्करात कार्यरत आहेत. एकाच घरातील तिघेजण कार्यरत असल्याने किर्दत कुटुंबाला सैनिकी परंपरा लाभली आहे.