सावित्रीबाई फुले यांची जयंती आता ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरी होणार, मंत्री भुजबळ यांना CM ठाकरे यांचे आश्वासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे. देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई यांनी स्वतः शिक्षण घेऊन महिलांना शिकवण्याचे काम केले. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी केली आहे त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मान्यता दिली असून आता सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरी होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना छगन भुजबळ म्हणाले की, महिलांना ‘चूल आणि मूल’ या परंपरेतील चार भिंतीच्या पलीकडे आणण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आहे. त्या काळात सामाजिक बहिष्कार स्वीकारून प्रसंगी शेण आणि दगडधोंड्यांचा मार सहन करत त्यांनी मुलींना शिकवण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा देशभरात देखील ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन आता केंद्र शासनाकडे याबाबत मागणी करणार आहे.

या चर्चेच्यावेळी छगन भुजबळ यांनी इतर मागासवर्गीयांचे आरक्षण वाचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने उच्च व सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ आणि अनुभवी विधिज्ञांची नेमणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. त्या निवेदनावर चर्चा करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी देखील तात्काळ मान्य केली.

याविषयी प्रतिक्रीया व्यक्त करताना युवा माळी संघाच्या अध्यक्षा सुनीता भगत म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज सर्वच क्षेत्रात महिला अभिमानाने कार्य करतात.