उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याची ज्येष्ठ वकिलांची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमुळे राज्यातील अनेक लहान वकिलांवर उपासमारीची वेळ आली असून ते काम मिळवण्यासाठी धडपडत आहेत. कोरोना आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहे, असे समजून त्याच्यासोबतच जगताना आवश्यक ती खबरदारी घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज नियमित सुरू करावे अशा आशयाचे पत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या काही ज्येष्ठ वकिलांनी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांना लिहिले आहे.

कोरोनामुळे मुंबई उच्च न्यायालयात फक्त तातडीच्याच खटल्यांवर सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ विजय थोरात, अनिल साखरे, प्रसाद ढाकेफळकर, विनीत नाईक, एव्ही अंतूरकर, प्रसाद दानी, अतुल दामले, विश्वजीत सावंत, जनक द्वारकादास, इक्बाल चागला, एन.एच. सिरवई आणि दरायस खंबाटा यांच्यासारख्या मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांना पत्रा लिहले आहे.

राज्यातील अनेक लहान वकिलांवर उपासमारीची वेळ आली असून ते काम मिळवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचाही विचार होणे आवश्यक आहे. आपण ही यंत्रणा कोसळू देऊ शकत नाही, असे मत ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी या पत्रातून व्यक्त केले आहे. सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडत असली तरी व्हिडिओ कॉन्फरंन्सिगमध्ये अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे मोजक्याच कर्मचारी वर्गामध्ये कोर्टाचे नियमित कामकाज सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.