काय ? होय ! येत्या 1 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांचे पास बंद होणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ नागरिकांना माफक दरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करण्यासाठी पासऐवजी अत्याधुनिक स्मार्ट कार्ड दिले जात आहे. महामंडळाकडून दिले जाणारे हे स्मार्ट कार्ड आधार कार्डशी जोडलेले असणार आहे. यासाठीच्या नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदत आहे. जून 2019 पासून ही सेवा सुरू झाली असून ज्या नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी आधार नोंदणी केली आहे त्यांना 1 जानेवारी 2020 नंतर एसटीनं प्रवास करताना तिकीटात सवलत मिळणार आहे. असे न केल्यास संबंधित नागरिकांना पूर्ण तिकीट दर अदा करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 12 आगारांमध्ये आतापर्यंत 1,01,500 ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. तर 50 हाजारांहून अधिक ज्येष्ठांना स्मार्ट कार्डचं वितरण झालं आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, गारगोटी, कुरुंदवाड, चंदगड, कागल, आजरा, मलकापूर, संभाजीनगर, गडहिंग्लज, राधानगरी, गगनबावडा येथील आगारांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्ड नोंदणी सुरु आहे.

पूर्वी दिले जाणारे विविध पासेस हे साध्या पद्धतीचे होते. डिजिटलायजेशन झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परिहवन महामंडळ प्रशासनाकडून स्मार्ट कार्ड दिले जात आहे. यात सर्व तपशील असेल, जसे की, पासधारकाचं नाव, प्रवासाची मुदत इत्यादी. ज्या पासांऐवजी हे कार्ड दिले जात आहे त्यात ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग, महात्मा गांधी समाजसेवा, आदिवासी सेवक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त नागरिक तसेच अधिस्विकृती पत्रकारांना मोफत तसेच सवलतीच्या दरात दिले जाणारे पासेस यांचा समावेश होतो. नवीन दिले जाणारे स्मार्ड कार्ड केवळ 55 रुपयांचे नाममात्र शुल्क घेऊन दिले जात आहेत.

Visit : Policenama.com