आजोबा आपल्यासोबत ‘मन्नत’ मध्ये का राहत नाहीत ? चिमुकल्या अबरामचा बिग बींना प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – खरेतर कोणत्याही चित्रपटात रंगवलेले पात्र हे त्या सिनेमापुरतेच मर्यादित असते. पण छोट्या मुलांचे भावविश्वच इतके निरागस असते  की बऱ्याचदा हे आभासी विश्व त्यामधील पात्र त्यांना खरीखुरी वाटतात. आता असाच काहीसा भ्रम  शाहरुख खानच्या लहानग्या अबरामला झाला. आणि त्याने तितक्याच निरागसपणे ‘आजोबा आपल्यासोबत का राहता नाहीत’ असा भाबडा प्रश्न बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल विचाराला. खरंतर अबरामला आधीपासूनच अमिताभ बच्चन आपले आजोबा आहेत असे वाटते.
अमिताभ बच्चन यांची नात आराध्याचा नुकताच वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला असून या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रेटीकिडने हजेरी लावली होती. यावेळी छोटा अबरामदेखील आला होता. विशेष म्हणजे तो अमिताभ यांना शाहरुखचे वडील समजत असून ते आपल्यासोबत का राहत नाही असा निरागस प्रश्न त्याने उपस्थित केल्याचं खुद्द बिग बींनी सांगितलं.
अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये त्यांच्यासोबत अबराम आणि श्वेता नंदा दिसून येत आहे. ‘शाहरुखचा हा लहानगा अबराम मला त्याचे अजोबा समजतो. मीच शाहरुखचा वडील आहे असा त्याचा समज आहे. त्यामुळे जर मी खरंच शाहरुखचा बाबा असेन तर मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी का राहत नाही असा प्रश्न त्याला पडला आहे’, असं बिग बींने शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. त्यामुळे अमिताभ -शाहरुख यांच्यात वडील- मुलाचं नातं असल्याचं अबराम समजतो. त्यामुळेच त्याने हा निरागस प्रश्न विचारल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.