शर्जिल उस्मानी आज होणार स्वारगेट पोलिसांसमोर हजर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषदेत केलेल्या भाषणासंबंधी नोंदविलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांपुढे हजर राहण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शर्जिलक उस्मानी आज स्वारगेट पोलिसांपुढे हजर राहणार आहे.

न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने पुणे पोलिसांना उस्मानीवर १६ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी उस्मानीला बुधवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी १६ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.

३० जानेवारी रोजी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उस्मानी याने समाजातील जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला. त्यावरुन स्वारगेट पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी उस्मानीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांनी फिर्याद दिली आहे.

त्याविरोधात शर्जिल उस्मानी याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी उस्मानीचे वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयात सांगितले की, पोलिसांनी समन्स बजावून बुधवारी चौकशीसाठी हजर राहायला सांगितले आहे. तो पोलीस ठाण्यात जायला तयार आहे. मात्र, त्याला अटक करु नये. त्यावर न्यायालयाने उस्मानीला बुधवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले तर, पोलिसांनी कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शर्जिल उस्मानी हा आज स्वारगेट पोलीस ठाण्यात हजर राहणार आहे.