शिक्रापुर : …तेव्हा Lockdown काळात ही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो

शिक्रापुर / प्रतिनिधी (सचिन धुमाळ ) – आग लागून डोक्यावर असलेले छप्पर गेले..संसार उघड्यावर आला मात्र समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत देत समाजात आजही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.
शिरुर तालुक्याच्या शिरसगाव काटा येथील मानेमळा परिसरात गेल्या पाच दिवसांपूर्वी अचानक लागलेल्या आगीत चार कुटुंबाच्या छप्पराच्या घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य, भांडी,कपडे जळून खाक झाले होते.संपूर्ण साहित्यच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने चार कुटुंबे उघड्यावर आलेली होती.याबाबत संकेतस्थळ “policenama”(पोलिसनामा)ने सर्वप्रथम सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

या घटनेची माहिती मिळताच भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी तत्काळ भेट घेत कुटुंबाला किराणा किट,ब्लँकेट,जीवनावश्यक वस्तू तसेच निवाऱ्यासाठी ताडपत्री ची व्यवस्था केली.सदर घटनेची तीव्रता लक्षात घेत खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे तसेच निर्वी ग्रामस्थांनी कुटुंबाला भांडी,किराणा,साड्या आदी वस्तूंची मदत केली.शिरूर येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करत शिरूर शहर व परिसरातून जमा केलेले भांडी,किराणा,जीवनावश्यक वस्तूंचे किट या कुटुंबाची भेट घेत सुपूर्द केले.

राज्यात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे अनेक दुकाने बंद आहेत.त्यामुळे मदत देणे अवघड होते.परंतु त्यातही या कुटुंबाला सावरण्यासाठी मदतीची गरज असल्याचे लक्षात येताच समाजातील अनेक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन कुटुंबाला मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान या कुटुंबाला शासकीय स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी या पुढेही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे जयेश शिंदे यांनी सांगितले.

या कुटुंबाला मदत देण्यासाठी भाजपचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, उद्योजक आबासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली चव्हाण,उषा घरत,ज्ञानदेव चव्हान,सतिश केदारीसह परिसरातील पत्रकार बांधव तसेच अनेक दानशूर लोकांनी पुढाकार घेतला असून आम्हाला संकटात लढण्यासाठी मोठी लाखमोलाची मदत केली असल्याचे या कुटुंबाने बोलताना सांगितले.