…म्हणून शिर्डी संस्थानकडून सरकारने घेतलं ५०० कोटींचं कर्ज

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील फडणवीस सरकारवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. त्यासाठी शिर्डी देवस्थान संस्थान ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला आहे. रोकड टंचाईच्या संकटात सापडलेल्या राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शिर्डीतील साई संस्थानकडून ५०० कोटींचं बिनव्याजी कर्ज घेतलं आहे.मंदिराच्या इतिहासातील ही विशेष बाब आहे.
या कारणसाठी घेतले कर्ज-

निळवंडे येथील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी साई संस्थानकडून ही मदत देण्यात आली आहे. या योजनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. जिरायती भागाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे निधीकरिता रखडली होती. कालव्यांच्या कामांना निधीची उपलब्धता व्हावी म्हणून शासन स्तरावर आपला पाठपुरावा सुरु होताच, परंतू शिर्डी संस्थाननेही या कालव्यांच्या कामांकरिता तात्पुरत्या स्वरुपात निधी द्यावा अशा मागणीचा प्रस्ताव शिर्डी संस्थानच्या माध्यमातून शासनाला सादर केला होता. या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली होती.

निळवंडे सिंचन प्रकल्प बऱ्याच काळापासून रखडला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे १२०० कोटी रुपये आहे. त्यासाठी मंदिर ट्रस्ट ५०० कोटी रुपये देणार आहे.शिर्डी देवस्थान ट्र्स्टचे अध्यक्ष आणि भाजपा नेते सुरेश हावरे यांनी राज्य सरकारला सिंचन योजनेसाठी कर्ज मागितल्यानंतर परवानगी दिली आहे.राज्य सरकारने आतापर्यंत इतकं मोठं कर्ज कुठल्याही संस्थेकडून घेतलेलं नाही. ही पहिलीच वेळ आहे. तसंच हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कुठलीही कालमर्यादा घालण्यात आलेली नाही. गेल्या १ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्जाच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. त्याचा प्रस्ताव शिर्डी साई संस्थानकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला साई संस्थानने शनिवारी मंजुरी दिली. दोन टप्प्यात हे कर्ज राज्य सरकारला दिलं जाणार आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, साईबाबा मंदिर ट्रस्ट आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने यासाठी सहमती पत्रावर सह्या केल्या आहेत.

शिर्डी हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. शिर्डीत दररोज ७० हजार भाविक साई बाबांच्या दर्शनाला येतात. उत्सवाच्या काळात ही संख्या साडेतीन लाखाच्यावर जाते. पण त्याभागात पाण्याची मोठी टंचाई आहे. यामुळे निळवंडे सिंचन प्रकल्पाद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे.  शिर्डी साई संस्थानने यापूर्वी सरकारी रुग्णालयासाठी ७१ कोटींचा निधी दिला होता. पण आता प्रथमच साई संस्थानने जनतेच्या हिताचा विचार करत ५०० कोटींचं व्याजमुक्त कर्ज सरकराला दिलं, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

विशेष म्हणजे सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणत्याही देवस्थानने यापूर्वी बिनव्याजी कर्ज दिले नव्हते. इतकेच नव्हे तर या कर्जाच्या परतफेडीसाठी कोणताही कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही.